आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Organizations Trying To Pressure On Vice Chancellor Of BAMU

विद्यापीठात कुलगुरूंची ‘परीक्षा’, विविध संघटनांचा दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडील दोन्ही पदांचा कार्यभार काढण्याचा वाद अजूनही शमला नाही. पदभार मिळवलेले कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट आणि परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांना त्वरित बदलावे, या मागणीसाठी सोमवारी (१९ जानेवारी) सायंकाळी विविध संघटनांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे ‘ठिय्या’ दिला, तर लगेच दुसऱ्या शिष्टमंडळाने निर्णय कायम ठेवण्यासाठी कुलगुरूंवर दबाव आणला. संघटना कुलगुरूंची ‘परीक्षा’ घेत असून ब्लॅकमेल करत असल्यामुळे रात्री पोलिसांना पाचारण करावे लागले.

१५ जानेवारी रोजी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडील दोन्ही पदभार काढून घेण्यासाठी कुलगुरूंशी शिवराळ भाषेत संवाद साधला. त्या वेळीही कुलगुरूंनी इच्छा नसताना गायकवाड यांना पदभार सोडण्यास सांगितले. डॉ. शिरसाट यांच्याकडे कुलसचिव आणि डॉ. सरवदे यांच्याकडे परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली. या प्रकरणावर आता पडदा पडण्यापूर्वी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज टीचर्स असोसिएशन (बामुक्टा) आणि मराठवाडा अंडर प्रीव्हेल्ज्ड टीचर्स असोसिएशनतर्फे (मुप्टा) कुलगुरूंना लेखी निवेदन दिले. दोन्ही पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार कार्यभार सोपवावा, १५ जानेवारीच्या गोंधळाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कुलगुरूंनी यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात हा ठिय्या सुरू असताना दुसऱ्या संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा कुलगुरूंना दबावात आणण्यासाठी तयारच होते. त्यांनी कुलगुरूंच्या दालनाचा अक्षरश: ताबा घेऊन आधी घेतलेला निर्णय कायम राहू द्या, अशी मागणी लावून धरली. बामुक्टाचे अध्यक्ष डॉ. विलास खंदारे, मुप्टाचे प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. गोपाल बच्छिरे, डॉ. महंमद बारी, प्रा. डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. गणी पटेल, अधिसभा सदस्य लक्ष्मीकांत शिंदे, राजेंद्र जाधव, अमोल दांडगे आदींची या वेळी उपस्थिती होती, तर दुसऱ्या बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे आदींचा समावेश होता.