आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरोग केंद्र समस्यांनी जर्जर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा क्षयरोग केंद्र गंभीर समस्यांनी जर्जर झाले असून, यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागच्या दोन-अडीच वर्षांपासून केंद्राला पालिकेचे थेंबभरही पाणी मिळत नसल्याने पिण्यासह स्वच्छतेचा प्रश्न तीव्र बनला आहे. केंद्रामध्ये क्षयरोगी आणि ‘एमडीआर-टीबी’चे अतिगंभीर क्षयरोगी निदान-उपचारासाठी येतात; परंतु त्यांना पिण्यासाठीच काय, बाथरूमसाठीही पाणी मिळत नाही. पाणीच नसल्याने साफसफाईचेही तीनतेरा वाजले आहेत.

आमखास मैदानाजवळ जिल्हा क्षयरोग केंद्राची जुनी इमारत आहे. जिल्हाभरातील क्षयरोगी तपासण्या, निदान व उपचारासाठी येतात. केंद्रातील प्रयोगशाळेत तपासण्या होऊन रुग्णांची नोंदही येथे होते. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळीकडेच क्षयरोगाची औषधी पुरवण्याचे काम येथून होते. पुणे-नागपूर व इतर ठिकाणांहून आलेल्या औषधांची साठवणूकही येथेच होते. त्यासाठी येथे ‘ड्रग स्टोअर’ आहे. असे महत्त्वाचे काम केंद्राद्वारे होत असतानाही मूलभूत गंभीर प्रश्नांनी केंद्र अडचणीत आले आहे. येथे पाण्याच्या मुख्य प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. मागच्या दोन ते अडीच वर्षांपासून महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने पाणी मिळवण्यासाठी केंद्राला अक्षरश: उसनवारी करण्याची वेळ आली आहे. या केंद्रामध्ये सुमारे 50 डॉक्टर-परिचारिका, अधिकारी-कर्मचार्‍यांसह 20-25 रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची वर्दळ असते. सर्वांसाठी पाण्याचा कूलर आहे; परंतु त्यात पाणी नसल्याने सर्वांचीच अडचण होते. विशेष म्हणजे केंद्रातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी ‘बायोमेट्रिक पंचिंग’ आहे; परंतु शेजारी पाण्याचा कूलर कोरडाठाक असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळते. येथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. सर्व कर्मचार्‍यांना घरून पाणी आणावे लागते किंवा विकत घ्यावे लागते. एखाद्या रुग्णास तातडीने पाणी लागले तर त्याने घ्यावे कुठून, हा खरा प्रश्न आहे.