आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - इटलीतील ट्रायोम ही चारचाकी वाहनांच्या विद्युत यंत्रणेची निर्मिती करणारी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर औरंगाबादच्या व्हेरॉक कंपनीने आता व्हिस्टिऑन या कंपनीचे दोन प्रकल्प विकत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या करारासंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली असून महिनाअखेरीस त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ऑटोमोबाइल कंपन्यांना लागणारे सुटे भाग तयार करणा-या व्हिस्टिऑन कंपनीच्या मुख्य महसुलापैकी 81 टक्के वाटा उत्तर अमेरिका आणि युरोपातून येतो. या कंपनीचे भारतातही प्रकल्प आहेत. युरोप आणि अमेरिकेतील मंदीमुळे आर्थिक संकटात असलेल्या या कंपनीने जगाच्या इतर भागातील आपली कमी गुंतवणूक करून आर्थिक स्थिती सावरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर 2011 पासून आपले काही प्रकल्प विकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
व्हेरॉक ही ऑटोमोबाइल पार्ट्स तयार करणा-या भारतातील कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, फोक्सवॅगन, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, सुझुकी, प्युजो, एनफील्ड, ड्युकाटी, होंडा, यामाहा, फियाट, बजाजसारख्या देशी-विदेशी कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. त्यात आता हार्ले डेव्हिडसनचीही भर पडली आहे. या क्षेत्रातील आपले स्थान आणखी बळकट करण्याचा व्हेरॉकचा प्रयत्न असून भारत आणि विदेशात मिळून एकूण 20 प्रकल्प कार्यान्वित आहेत. व्हेरॉकने नुकतेच युरोपात पाऊल टाकले असून मोटारांची विद्युत यंत्रणा तयार करणा-या ट्रायोम या युरोपातील सर्वात मोठ्या कंपनीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा विकत घेतला आहे. ट्रायोमचा व्हिएतनाममध्येदेखील प्रकल्प असून यामुळे युरोपसोबत दक्षिण पूर्व आशियात व्हेरॉकला पाय रोवायला संधी मिळाली आहे. ट्रायोम पाठोपाठ व्हेरॉकने आता व्हिस्टीऑन या कंपनीवर लक्ष केंद्रीत केले असून त्यांचा विद्युत यंत्रणेचा प्रकल्प विकत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
उद्योग जगतातील सूत्रांनी सांगितले की, व्हिस्टीऑनच्या या प्रकल्पाचे मूल्य अंदाजे 15 कोटी डॉलर्स आहे. यावर चर्चा सुरु असून साडे सात कोटी ते दहा कोटी डॉलर्सपर्यंत हा सौदा ठरू शकतो. या संदर्भात व्हेरॉकचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या विषयावर मौन बाळगणे पसंत केले. मागील महिन्यात ऑटोमोबाईल उद्योगविषयक एका नियतकालिकाला माहिती देताना तरंग जैन यांनी आणखी एक कंपनी विकत घेण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे म्हटले होते.
ड्यूकचे 20 भाग व्हेरॉकचे - व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी 6 सिलींडर क्रॅन्कशाफ्ट निर्मितीचा प्रकल्प व्हेरॉकने काही महिन्यांपूर्वीच सुरु केला आहे. त्याशिवाय बजाजने ऑस्ट्रेलियातील केटीएम ही रेसिंग मोटारासायकलचे भारतात वितरण सुरु केले आहे. केटीएम 200 ड्यूक या बाईकचे 20 भाग व्हेरॉकने तयार केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.