आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक होस्टेलमध्ये अधिकारी, कुलगुरूंच्या फोनची यादी लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या मवाल्याची तक्रार घेण्यास नकार देणारे बेगमपुरा पोलिस ठाणे आणि विद्यापीठ प्रशासन डीबी स्टारच्या वृत्तानंतर खडबडून जागे झाले आहे. मुलीची तक्रार न घेणार्‍या क ॉन्स्टेबलला पोलिस आयुक्तांनी चौकशीस बोलावले आहे. तसेच तिला नव्याने तक्रार करण्यास सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डीएसडब्ल्यूनेही पीडित मुलीची भेट घेऊन तिला तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे; तर या प्रकरणापासून धडा घेत विद्यापीठाशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण अधिकार्‍यांची नावे आणि मोबाइल नंबरची यादी सर्व होस्टेलमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक मवाली विद्यापीठात शिकणार्‍या एका तरुणीची अडीच महिन्यांपासून छेड क ाढत होता. याप्रकरणी ती होस्टेलच्या वॉर्डनकडे आणि बेगमपुरा पोलिसांत तक्रार देण्यास गेली, पण दोन्ही ठिकाणी तक्रार न घेतल्यामुळे तिने डीबी स्टारकडे धाव घेतली. त्यानंतर दैनिकाने 17 जानेवारीच्या अंकात ‘तक्रार कशाला, रस्ताच बदल’ हे वृत्त प्रकाशित केले. पोलिस आणि विद्यापीठाने त्याची गंभीर दखल घेत कारवाईची सूत्रे फिरवली.

कॉन्स्टेबलची चौकशी
मुलीची तक्रार दाखल करून न घेणारे बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल गायकवाड यांना पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी चौकशीस बोलावले असून पोलिसांनी या मुलीला पुन्हा एकदा नव्याने तक्रार द्यायला सांगितले आहे.

विद्यापीठातही खळबळ
विद्यापीठानेही डीबी स्टारच्या वृत्तानंतर डीएसडब्ल्यू वाल्मीक सरोदे यांनी पीडित मुलीची भेट घेतली. घडलेला प्रकार आधी विद्यापीठाला कळवला असता तर तत्काळ कारवाई केली गेली असती, असे ते म्हणाले; मात्र हा प्रकार घडला त्या वेळी विद्यापीठाला सुटी होती. प्रभारी वॉर्डनने आपला मोबाइल क्रमांक देण्यास नकार दिला होता, हे या विद्यार्थिनीने सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सरोदे यांनी तिला तक्रार दाखल करण्याची सूचना केली. तसेच विद्यापीठाशी संबंधित सर्व कर्मचार्‍यांचे नाव आणि क्रमांक प्रत्येक होस्टेलमध्ये लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रसंगात विद्यार्थिनींनी स्वत:ला असुरक्षित समजू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.