आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीडीआर यंत्रणेमुळे चार तासांत चोरीच्या गाडीचा छडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोटारीला किल्ली लावल्यापासून प्रत्येक यांत्रिक कामाची आणि प्रवासाची नोंद ठेवणार्‍या ‘व्हीडीआर’ अर्थात व्हेइकल डाटा रेकॉर्डरमुळे चोरीला गेलेली बोलेरो अवघ्या चार तासांत चोरट्यासह हस्तगत करण्यात आली. या प्रकरणात आंतरराज्य टोळीतील एका चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर दुसरा फरार झाला. अवघ्या बारा हजारांत मिळणारी ही आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घराबाहेर चारचाकी पार्क करणार्‍यांना निर्धास्त झोप घेण्यास मदत करणारीच ठरली.

वाहने एका राज्यातून चोरायची आणि बनावट कागदपत्रे करून ती बाहेरच्या राज्यांत विकण्याचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. मोन्सेंटो सीड्स कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणार्‍या रवींद्र ज्ञानदेव निगुडे यांची बोलेरो गाडी (एमएच 20 बीएन 8509) कासलीवाल प्रांगण येथील घरासमोरून याच रॅकेटने चोरली.

बनावट किल्लीचा वापर

रात्री आठला त्यांनी गाडी घरासमोर लावली होती. सकाळी उठून पाहतात तो गाडी चोरीला गेली होती. बनावट किल्ली वापरून चोरट्यांनी ही गाडी मध्यरात्रीनंतर पळवली. निगुडे यांनी पोलिस ठाण्यात तातडीने धाव घेत तक्रार केली. तक्रार नोंदवताना त्यांनी गाडीत ‘व्हीडीआर’ बसवल्याचे सांगितले. त्यावरून गाडीचा माग काढण्यात आला.

धाड गावातून उचलले

गाडी ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी वाहनचोरांचा छडा लावला. शेख दाऊद ऊर्फ बब्बू शेख मंजूर (45, रा. धाड, कर्डी फाटा, बुलडाणा) याला जवाहरनगर पोलिसांनी धाड येथे अटक केली.