आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदांतनगरात 14 लाखांची घरफोडी- 16 तोळे सोने, 1 हिर्‍यांचा हार आणि चार लाख रुपयांची रोकड लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लग्न समारंभासाठी पुण्याला गेलेल्या मेडिकलच्या होलसेल व्यापार्‍याचे घर फोडून चोरट्यांनी 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, एक हिर्‍यांचा हार, चार लाखांची रोकड, असा 14 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उघडकीस आली. पारस शांतीलाल ओस्तवाल (रा. प्राइड पार्क, वेदांतनगर) असे या व्यापार्‍याचे नाव आहे.

उस्मानपुर्‍यातील संत एकनाथ रंगमंदिराशेजारी ओस्तवाल यांचे मेडिकल आहे, तर वेदांतनगरातील प्राइड पार्क अपार्टमेंटमधील तळमजल्यावर त्यांचा दुमजली बंगला आहे. या अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. शनिवारी सायंकाळी ओस्तवाल यांच्या मुलांना नृत्य शिकवणारे शिक्षक घरी आले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी ओस्तवालांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचे भाऊ सचिन घरी आले. तेव्हा पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील सात ते आठ लाकडी कपाटे फोडल्याचे उघड झाले. त्यांनी क्रांती चौक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे जमादार हेमंत सुपेकर व त्यांचे सहकारी, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट घरी पोहोचले. रात्री 10.30च्या सुमारास शहरात आलेल्या ओस्तवाल यांनी 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, एक हिर्‍यांचा हार, चार लाखांची रोकड, असा 14 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.