आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फळे, भाजीपाला टिकवणारे उपकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बेभरवशाचा पाऊस, दलालांचा कब्जा आणि एकूणच चुकीची व्यवस्था यामुळे शेतकरी भरडला जातो. हा बळीराजा राबराब राबतो. बर्‍याच वेळा सगळी परिस्थिती अनुकूल झाल्यास चांगले उत्पादन येते, पण शेतमाल टिकवून ठेवण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे या मालाची नासाडी होते. त्यात भारनियमनामुळे विजेवर चालणारी यंत्रे काम करत नाहीत. अशा लोकांसाठी काहीतरी करावे या उद्देशाने वैभव तिडके आणि अश्विन पावडे या दोन इंजिनिअर तरुणांनी सोलार ड्रायर नावाचे सौर ऊर्जेवर चालणारे वाळवण यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. लगेच हा विचार आपल्या सायन्स फॉर सोसायटीत मांडला. त्यानंतर स्वप्निल कोकाटे, डॉ. शीतल सोमानी, अश्विनी गायकवाड, स्वाती शिंपी, डॉ. तुषार गवारे आणि निकिता खैरनार या सहकार्‍यांच्या मदतीने संशोधन करून हे यंत्र तयार झाले.
साडेतीन वर्षे परिश्रम : पिकांच्या कापणीनंतर बाजारपेठेत माल विक्री होईलच याची शाश्वती नाही. कधी लवकर, तर कधी उशिराने मालाला मागणी मिळते. मात्र, या काळात शेतकर्‍यांच्या पिकांची, फळांची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. अपुर्‍या तंत्रज्ञानामुळे दरवर्षी 60 दशलक्ष टन फळे, भाजीपाला नष्ट होतो. बाजारात ऊर्जेवर चालणारी काही यंत्रे असली, तरी त्यांना वीज लागते; पण ग्रामीण भागात वीजच नसते. त्यामुळेच आम्ही हे विजेशिवाय चालणारे यंत्र तयार करण्याचा विचार केल्याचे वैभव तिडके याने सांगितले. वैभवने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत केमिकल इंजिनिअरिंग केले. पीएचडीही मिळवली. हे करत असतानाच बाजारातील वाळवण यंत्रांचा अभ्यास सुरू केला. साडेतीन वर्षांच्या कालावधीत विविध तज्ज्ञांकडून, प्राध्यापक डॉ. भास्कर थोरात यांच्याकडून मार्गदर्शन मिळवले. इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेशी संलग्न असलेल्या आमच्या सायन्स फॉर सोसायटीच्या सर्वच मित्रांनी परिश्रम करून अखेर सोलार ड्रायर म्हणजेच वाळवण यंत्र तयार केले.

अशी आहे यंत्राची रचना : हे यंत्र 6 बाय 6 फुटांचे आणि 4 मीटर लांब असून त्यात पालेभाज्या, फळे, कांदे, कडधान्ये, सुकी मासळी वाळवून साठवण करता येते. वाळवण यंत्राच्या मध्ये हे पदार्थ 5 ते 6 तास ठेवल्यास नंतर वर्षभरासाठी साठवून वापरता येतात. जड पदार्थ वाळवण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. एकावेळी ट्रेमध्ये 12 ते 14 किलो पदार्थ वाळवता येऊ शकतात. यातील खास वैशिष्टये म्हणजे पदार्थाचा रंग, सुगंध, पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. त्यातील सत्त्व कायम राहते. हे यंत्र वापरण्यास अत्यंत सोपे आहे. वापरात नसताना त्याचे पार्ट वेगळे करून ठेवता येतात. अतिशय साधी जोडणी आहे. साधारण 4 मीटरच्या स्टॅण्डवर दोन्ही बाजुला दोन-दोन मेटल ट्रे लावण्यात आले आहेत. ट्रे फुड ग्रेड कास्टिंगपासून बनविण्यात आलेला असून यंत्राचे वजन 35 किलो आहे. त्यात उष्णता परावर्तीत होणे, हवेतून ऊर्जा मिळणे व पदार्थावर थेट सूर्यकिरण पडणे या उष्णता वहनाच्या तिन्ही प्रकारांचा वापर होतो. यामुळे यंत्राची कार्यक्षमता 25 टक्यांनीवाढली आहे. शिवाय आकार 4 मीटरपासून 16 मीटरपर्यंत वाढविता येतो.

नऊ राज्यात बसविले शंभर यंत्र : या प्रकल्पाचा उपयोग मर्यादित न राहता याचा वापर महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यात केला जात आहे. शंभरहून अधिक यंत्रे आजपर्यंत
बसविण्यात आलेली असून आफ्रिकेतील 50 शेतकर्‍यांसाठी यंत्र तयार केले जात आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये
३ यंत्रात 12 ते 14 किलो पदार्थ वाळवता येतात.
३ आवश्यकतेनुसार यंत्राची क्षमता वाढवता येते.
३ पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र असल्याने विजेची गरज नाही
३ चिकू, अंबा, अननस, डाळिंब, मिरची, हळद, कोथिंबीर, मासे, आवळा, पुरण, मटकी असे विविध 45 पदार्थ वाळवता येतात.

काय आहे सायन्स फॉर सोसायटी ग्रुप?
या सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन सायन्स फॉर सोसायटी नावाचा ग्रुप उभारला. त्यात इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए झालेले व्यवस्थापन तज्ज्ञ असे विविध क्षेत्रांतील लोक आहेत. या गु्रपनेच हे यंत्र तयार केले. विविध प्रकारचे संशोधन करण्याचे काम हे लोक करतात. मुंबईत ही संस्था असली, तरी त्यातील बहुतांश लोक मराठवाडा आणि विदर्भातील आहेत.

शेतकर्‍यांसाठी केले संशोधन
४आठवडी बाजारात फिरत असताना संध्याकाळी पालेभाज्यांचे भाव पडायचे. यावर काहीतरी करावे हा मनात विचार आला. त्यातून सौर ऊर्जेवर चालणार्‍या या यंत्राची निर्मिती झाली. गरीब शेतकर्‍यांना फायदा होत आहे.
-वैभव तिडके, संशोधक
आणखी सुधारणा करतोय
सौर वाळवण यंत्र शेतकर्‍यांसाठी उपयोगी ठरत आहे. यात आम्ही अद्ययावत सुधारणा करण्यासाठी संशोधन करत आहोत. यासाठी शासनासोबतही चर्चा करणार आहोत.
-अश्विन पावडे, संशोधक
शेतकर्‍यांसाठी फायदेशीर
४सौर वाळवण यंत्र शहर असो की गाव, प्रत्येकासाठी उपयोगी आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या मालाची नासाडी थांबेल आणि शेतकर्‍यांना नफा वाढीस फायदा होईल.
-डॉ. शीतल सोमाणी, संशोधक
फोटो - विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सोलार ड्रायरचे मॉडेल. गरजेप्रमाणे त्याची क्षमता वाढवता येते.