आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक - पुन्हा वाहन तपासणी, रोख रकमेवरही वॉच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आदर्श आचारसंहिता लागू झाली असून येत्या सोमवारपासून प्रत्येक मोटारीची तपासणी, कॅमेऱ्याचा दरारा अन् रोख रकमेची तपासणी हा प्रकार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत हा प्रकार नित्याचाच एक भाग होईल.

दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मोटारींची तपासणी, त्यात रोख रक्कम आढळली तर ती जप्त करणे, प्रत्येक कारवाईची नोंद व्हिडिओ कॅमेऱ्यात घेण्याचा प्रकार झाला होता. अनेकांना याचा त्रास झाला असला, तरी यामुळे नागरिकांना पैशांचे आमिष दाखवण्याचा प्रकार घडला नसल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला. लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जरा जास्तच कडक असेल, असे संकेत आयोगानेच पूर्वी दिले होते.

लोकसभा निवडणुकीत कोणी रोख रक्कम निवडणुकीच्या कामासाठी तर नेत नाही ना, याची तपासणी झाली होती. या वेळी त्यापेक्षाही कडक तपासणी केली जाणार आहे. मद्य तसेच रोख रकमेची तपासणी केली जाईल, प्रत्येक वाहन तपासले जाईल, प्रत्येक कारवाईची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल.

१७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी
आचारसंहिता लागू झाली असली, तरी ज्यांची नावे मतदार यादीत अजून येऊ शकली नाहीत, असे तरुण तसेच जुने मतदार येत्या १७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करू शकतील. प्रत्येक तहसील कार्यालयात ही नोंदणी होणार आहे. येत्या रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर आयोगाचे कर्मचारी उपस्थित राहणार असून तेथे मतदार नोंदणी, पत्त्यातील बदल, नावातील बदल आदी कामे केली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ ऑगस्टला अंितम मतदार यादीचे स्वरूप स्पष्ट झाले असले, तरी १७ सप्टेंबरपर्यंत जे नागरिक नोंदणी करतील त्यांची नावे पुरवणी मतदार यादीत असणार आहेत.

याची घ्या खबरदारी
दसरा, दिवाळीचा काळ असल्याने अनेक लोक खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. त्यासाठी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन फिरताना पोलिसांच्या तपासणीत अडकू शकतात. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. तो टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.
दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन फिरणे टाळा.
दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम असल्यास ज्या बँकेतून रक्कम काढली त्याची विथड्रॉल स्लीप सोबत ठेवा.
एटीएममधून रक्कम काढली असल्यास त्याची पावती बाळगा.
खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी रकमेसह घराबाहेर पडले असल्यास त्याची माहिती देणारी प्रत सोबत ठेवा.

वस्तू खरेदीसाठी जात असाल तर त्याबाबत पोलिसांना सत्यता पटवून देण्याची तयारी ठेवा.
मजुरांचे किंवा प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी जात असाल तर वेतन रजिस्टर सोबत ठेवा.