लासूर स्टेशन - अज्ञात वाहनाने उडवल्यानंतर रस्त्यावर पडलेली एक वेडसर महिला दुस-या वाहनाखाली अडकून सुमारे ८ कि.मी. फरपटत गेली. मुंबई-नागपूर महामार्गावर गुरुवारी रात्री १० वाजता हा थरकाप उडवणारा थरार घडला.
महामार्गावर असलेल्या भानवाडी टोलनाक्यावरील कर्मचा-याने गाडीला काही तरी अडकल्याचे चालकाला सांगितल्यावर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत चालक अनभिज्ञच होता. घटना कळताच शिल्लेगाव पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नव्हता.
आधी अज्ञात वाहनाच्या धडकेनंतर रस्त्यावर पडलेली ही महिला अर्टिगा कारखाली (एमएच २० सीएस १६६१) अडकली. चालकाच्या हे लक्षात आले नाही. खडकनारळा ते भानवाडी टोलनाका असे ८ कि.मी. अंतर ही महिला फरपटत गेली होती.