आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन बाजाराने लुटले दसऱ्याचे सोने; कपडा, इलेक्ट्रॉनिक, सोने-चांदीची विक्री 70% कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जीएसटी लागू झाल्यानंतरचा पहिला दसरा, दिवाळी हे सण कसे पार पडतात याची थोडीफार झलक शनिवारी (३० सप्टेंबर) पाहावयास मिळाली. दसऱ्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या ग्राहकराजाची व्यापारी आतुरतेने वाट पाहत होते. परंतु प्रत्येक व्यवहार रेकॉर्डवर येणार असल्यामुळे त्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के खरेदी कमी केली, असे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले.
 
सोने-चांदीच्या व्यवहारांवरही सरकारने बारीक नजर ठेवल्याने सराफा बाजारातही यंदा सावधपणेच खरेदी झाली. फुलला तो फक्त वाहन बाजार, त्यासह खाद्यपदार्थांचीही विक्री तेजीत होती. एकूणच ग्राहकांनी २५ ते ३० टक्केच रक्कम खर्च केली, असेही व्यापारी म्हणाले. 
 
गतवर्षी नोव्हेंबर रोजी नोटाबंदी झाली तेव्हा दिवाळी नुकतीच संपली होती. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीवरचा भर कमी होताच शिवाय पुढील सहा महिने बाजार याच निर्णयामुळे दोलायमान स्थितीत होता. व्यावसायिक असो वा नोकरदार, देशभरातील प्रत्येकावर नोटाबंदीचा परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यानंतर जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतरचे काही दिवस गोंधळाचे होते. 
 
नवीन करपद्धतीतील तरतुदी जाणून घेताना व्यापारी वर्गाची मोठी तारांबळ उडाली. काही क्षेत्रांत गोंधळाचीच स्थिती असतानाच दसरा आला. यंदा प्रथमच जीएसटीअंतर्गत व्यवहार होणार असल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांनीही जपून पावले टाकली. 
 
ग्राहकी घटली 
सरकारच्या सर्वच निर्णयांचा एकत्रित परिणाम यंदा बाजारावर पाहावयास मिळाला. ग्राहकी घटली हे निश्चित. मुख्य कारण नोटाबंदी, जीएसटी. नोटाबंदीतून सावरताना वेळ गेला. जीएसटीमुळे बाजारात गडबड झाली. त्यातच दुकानांची वाढलेली संख्या, अशी अनेक कारणे दसऱ्याच्या व्यवहारांवर परिणाम करणारी ठरली. 
- अजय शहा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ 
 
व्यवहारांवर करडी नजर 
नोटाबंदी केल्यानंतर शासनाने प्रत्येक शहरात झालेल्या सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीचा तपशील मागवला होता. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकही हैराण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आयकर आणि जीएसटी विभागाची सर्वच व्यवहारांवर करडी नजर असल्यामुळे यंदा प्रथमच ग्राहकांनी गरजेपुरती खरेदी केल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून उमटल्या. 
 
सावट कायम : दुकानदार म्हणाले, जीएसटीनंतरचे तीन महिने व्यापारी वर्ग हैराण होता. त्यानंतर लगेच वर्षातले सर्वात मोठे सण आले. वाहन बाजार वगळता कपडा, इलेक्ट्रॉनिक, सोने-चांदीच्या बाजारात ७० टक्के खरेदी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...