आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगाल तिथे मुलाचा विवाह करू, मुलगी तुम्हीच शोधा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विवाहासाठी‘कोणी मुलगी देता का मुलगी’ अशी दवंडी देण्याची वेळ जिल्ह्यातील उपवरांवर आली आहे. हे एखाद्या सामाजिक संस्थेने केलेले सर्वेक्षण नाही तर हा आहे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची विवाहासाठी नोंद करण्यासाठी गावोगाव फिरलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आलेला अनुभव. सांगाल तिथे मुलाचा विवाह करू, मात्र मुलगी तुम्हीच शोधा, अशी गळ मुलांच्या वडिलांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना घातली आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली तर काय होते, असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील तरुणांना विचारला तर त्यांची व्यथा अन् सामाजिक समस्येचे उत्तर समोर येईल. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी जिल्हाप्रमुख दानवे गावोगाव फिरले. तेव्हा उपवरांना मुलीच मिळत नाहीत. काही तरुण तर चार वर्षांपासून वधूच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

आपोआपच हुंडाबंदी : हुंडाकमी किंवा वेळेत मिळाला नाही म्हणून विवाह मोडल्याची अनेक उदाहरणे आहेतच शिवाय वधूपित्याने विनवण्या कराव्यात, असे समीकरणही पूर्वापार चालत आले आहे, परंतु आता फक्त मुलगी द्या, अशी विनंती मुलाचे वडील करत आहेत. दानवे यांना हाच अनुभव आला. एखाद्या शेतकऱ्याकडे विवाहयोग्य मुला-मुलींबाबत विचारणा करताच "मुलाचे लग्न करायचे पण मुलगीच मिळत नाही. गरिबाचीही चालेल, हुंडा म्हणून एक छदामही घेणार नाही, फक्त मुलगी घेऊन या, अशी विनंती अनेकांनी केली. या परिस्थितीने आपोआपच हुंडाबंदी झाली असून हुंडा नको फक्त मुलगी द्या, असे वारे वाहू लागले आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही गावांतील मुलांचे वडील चार ते पाच वर्षांपासून योग्य स्थळाच्या शोधात आहेत. हुंडा नको, शिक्षणाची अट नाही, लग्नात मिरवणे नाही, फक्त मुलगी द्या, असे जाहीर सांगत अनेकजण गावोगाव फिरत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले.

लेकीने शहरात जावे ही इच्छा
दुष्काळामुळे खिशात दमडी नाही अन् प्यायला पाणी नाही. त्यामुळे लेकीचा संसार शहरात फुलावा अशी वधूपित्यांची इच्छा आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात सोयरीक जमवण्यास ते तयार नाहीत. मुलगा मोलमजुरी करणारा असला तरी चालेल पण त्याने शहरात राहावे, आपल्या वाट्याला आलेले दु:ख लेकीच्या वाट्याला येऊ नये, अशी वधूपित्याची भावना आहे. विशेष म्हणजे त्यासाठी हुंडा द्यायलाही ते तयार आहेत.

आमचे लग्न जमवून द्या ना प्लीज
शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी गावोगाव फिरून सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी करत होते. तेव्हा अनेक तरुण तसेच त्यांच्या वडिलांनी सेनेच्याच पदाधिकाऱ्यांना विवाह जमवून देण्याची विनंती केली. "चार वर्षांपासून लग्न जमत नाही, आम्हाला काहीही नको, फक्त मुलगी तेवढी बघा', असे वरपिता सांगत होते.