आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भूमिगत’ कामांवरून शिवसेना, ‘एमआयएम’ जातीयवादावर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भूमिगत गटार योजनेच्या कामात अधिकारी जातीयवाद करत आहेत. एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डात जास्तीची कामे होताहेत. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना तेथून हटवले तरच समान पद्धतीने कामे होतील, असा आरोप सेना नगरसेवक रावसाहेब आमले यांनी केला अन् स्थायी समितीच्या बैठकीत सेना एमआयएमच्या नगरसेवकांत जातीय शब्दयुद्ध भडकले.

सत्ता नसतानाही आमच्या वाॅर्डात जास्तीची कामे होतात हे तर आमचे ‘स्किल’ आहे, अशा शब्दांत विकास एडके यांनी प्रारंभी उत्तर दिले. मात्र, नंतर संगीता वाघुले, समीना शेख या नगरसेविका तुटून पडल्या. विशिष्ट पक्षाचा किंवा जातीचा उल्लेख अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. एमआयएमचे नगरसेवक जुन्या शहरातून मोठ्या संख्येने निवडून आले आहे. त्यामुळे तेथे जास्तीची कामे होणारच, असे एडके यांचे म्हणणे होते. तर आमले स्वत:च्या आरोपावर ठाम होते.

कामांचा अहवाल द्या : सभापती मोहन मेघावाले यांनी यात हस्तक्षेप करत अधिकारी हा अधिकारी असतो, त्याच्याकडे जातीय नजरेतून पाहता कामा नये. भूमिगतची कामे कोणत्या वाॅर्डात किती झाली, याचा अहवाल सिद्दिकी यांनी पुढील बैठकीत सादर करावा. त्यानंतर त्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर हा वाद एकदाचा पुढे ढकलला गेला.

एमआयएमचे प्रत्युत्तर : आपल्या वाॅर्डात कामे करून घेणे हे प्रत्येक नगरसेवकाचे काम आहे. आम्ही जास्ते काम करू शकलो कारण ते आमचे स्किल आहे. शिवाय जुन्या शहरात या प्रकल्पाची जास्त कामे सुरू आहेत अन् एमआयएमचे नगरसेवक याच भागातून विजयी झाले आहेत. तेव्हा जातीयवादाचा आरोप करता कामा नये.

पुढे काय होऊ शकते?
सभापतीमेघावाले यांनी कामांचा अहवाल मागवला असून तो येण्यापूर्वीच तक्रार करणाऱ्या नगरसेवकांच्या वाॅर्डांत कामे सुरू झालेली असतील. त्यामुळे त्या बैठकीत नगरसेवक हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची शक्यता कमीच राहील. अहवालात एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डातील कामे दिसतील. कारण जुन्या शहरात आधी कामे करायचे ठरलेले आहे एमआयएमचे नगरसेवक याच जुन्या शहरातून मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. प्रशासन जे करतेय ते ठरल्यानुसारच हे समोर येईल. मात्र, पुन्हा आरोप नकोत म्हणून अधिकारी इतर नगरसेवकांच्या वाॅर्डातील कामांना प्राधान्य देतील.

सेना नगरसेवक काय म्हणाले : भूमिगत गटार योजनेची जास्तीची कामे एमआयएम नगरसेवकांच्या वाॅर्डात सुरू आहेत. अफसर सिद्दिकी या प्रकल्पाचे प्रमुख असल्याने असे चित्र दिसते. त्यांना तेथून हटवले तर सर्वत्र कामे होतील.

असंसदीय शब्दांची परंपरा कायम
‘अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत,’ असे वक्तव्य सर्वसाधारण सभेते एका नगरसेवकाने केल्याने आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी कामकाजावरच बहिष्कार घातला होता. त्यानंतर असे असंसदीय शब्द नगरसेवक वापरणार नाहीत, अशी अपेक्षा होती. परंतु आजच्या बैठकीत नगरसेवक रावण आमले यांनी पुन्हा तोच शब्द वापरला. ‘तो शब्द वापरण्याची इच्छा नाही, परंतु अधिकारी कामच करत नसतील तर काय म्हणावे,’ असा सवालही त्यांनी समर्थनार्थ केला. मंगळवारी अधिकाऱ्यांनी यास आक्षेप मात्र घेतला नाही.
बातम्या आणखी आहेत...