आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सवाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन; तिकीट विक्रीला उत्तम प्रतिसाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: येत्या 27 जानेवारीपासून वेरूळ-अजिंठा महोत्सवाला प्रारंभ होत असून पर्यटन सचिव आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते सोनेरी महालात या महोत्सवाचे उद्घाटन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांची उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख उपस्थिती राहील. या वेळी त्यांनी महोत्सवाची तयारी, प्रचार, प्रसिद्धी आणि इतर व्यवस्थांबद्दल सविस्तर माहिती दिली.
रसिकांसाठी 40 सिटीबस : सोनेरी महाल आणि कलाग्राम या ठिकाणी नागरिकांना सहज जाता यावे यासाठी 40 सिटीबसची खास व्यवस्था करण्यात आली आहे. चिकलठाणा ते सोनेरी महाल, कलाग्राम या मार्गावर विशेष बस धावतील. शिवाजीनगरपासून या दोन्ही ठिकाणी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. जळगाव टी पाइंट, बजाजनगर, सिडको, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणाहून शहरातील विविध मार्गांनी सोनेरी महाल व कलाग्राम या ठिकाणी प्रेक्षकांना पोचता येईल.
मराठमोळा मेन्यू : कलाग्राममध्ये येणार्‍या प्रेक्षकांसाठी खास मराठी खाद्यपदार्थांची मेजवानी असेल. त्यासाठी बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये पुरणपोळी, झुणका-भाकर, बाजरीची भाकरी,पाटवड्या, शेवग्याची भाजी, गव्हाची खीर, गुळाची पोळी, तिळाची पोळी, मिसळ, बासुंदी, जिलेबी, उकडीचे मोदक, लापशी यासह 62 पदार्थांची चव चाखता येईल.
तिकीट विक्री जोरात : महोत्सवासाठी 10 हजार तिकिटे छापण्यात आली असून दोन दिवसात 2 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पहिल्याच दिवशी 6 तिकिटे खरेदी करून विक्रीचा प्रारंभ केला. कलासागर ग्रुपने 1200 तिकिटांची खरेदी केली आहे.