आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सवाच्या तयारीला वेग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. विविध कलाविष्कारांचा संगम असणा-या या महोत्सवाच्या रंगमंचाद्वारेही कला संस्कृतीची अनोखी झलक पाहायला मिळणार आहे. मुकुंद गोलटगावकर यांच्यावर रंगमंच साकारण्याची जबाबदारी आहे.
महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा म्हणून प्रशासनानेही कंबर कसली आहे. तीन वर्षांचा खंड पडल्यानंतर पुन्हा सुरू होणा-या महोत्सवाला झळाळी देण्याच्या दृष्टीने रंगमंच तयार करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. रंगमंच कसा असेल यासंबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. थ्रीडी इफेक्ट साधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
रंगमंच तयार करण्यात गोलटगावकर यांचा हातखंडा आहे. गोलटगाव या छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. मेहनती आणि कष्टाळू कलाकार म्हणून ते ओळखले जातात. 2005 साली त्यांनी महोत्सवासाठी पहिल्यांदा रंगमंच उभारला होता. त्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे स्तंभ आकर्षक ठरले होते, तर दुस-या वर्षी वेरूळ-अजिंठामधील कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. 2007 मध्ये त्रिमूर्तीचे शिल्प आणि वेरूळ लेणीच्या चित्राने महोत्सवात भर पडली होती. 2008 मध्ये 15 फूट उंचीची नटराज मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र, मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होऊ शकला नव्हता.
यंदा 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला महोत्सवाला सुरुवात होत असून 29 जानेवारीला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असून यामध्ये दिग्गज कलावंत सहभागी होणार आहे. 19 जानेवारीपासून तिकीट विक्रीला सुरुवात होईल.