औरंगाबाद - अयोध्येत लवकरच अद्भूत राममंदिर पहायला मिळेल, त्यामुळे संशय बाळगण्याचे कारण नाही. सर्वांच्या सहभागाने मोदी सरकार ते उभारणारच आहे, असा विश्वास साध्वी ऋतंभरा यांनी व्यक्त केला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने औरंगाबादेत आयोजित हिंदू संमेलनासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद...
प्रश्न : भाजप सत्तेत येऊनही लोकांच्या मनात मंदिराबाबत शंका आहे.
- हा संशय बाळगण्याचे कारणच नाही. ती जागा श्रीरामाचे जन्मस्थान आहे, हे न्यायालयानेही मान्य केले आहे.
याचिकाकर्ते हाशीम अन्सारी यांनीही रामलल्ला मुक्त व्हावेत, असे म्हटले आहे. देशात सहमती, सहकार्याचे वातावरण बनत असेल तर अद्भूत राममंदिर उभे राहीलच.
मंदिर नेमके कधी होणार?
- राम मंदिर उभारण्यास उशीर होतो हे मान्य आहे. त्यासाठी भारतवासियांनी खूप मोठे बलिदान दिले आहे. आमच्या सत्तर पिढ्यांनी त्या आस्थेच्या ज्योतीस
आपल्या श्रम, रक्ताने आजही जीवित ठेवले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत व्यर्थ जाऊ शकत नाही. लवकरच रामलल्ला मंदिर होणारच, असे आम्हाला वाटते.
साधू-संतांनी सरकारला काही अल्टिमेटम दिलाय का?
- साधू-संत अल्टिमेटम देत नाहीत. साधू-संत नेहमी आपल्या इच्छा अभिव्यक्त करतात. त्यांच्याकडे संयम आहे. मोदी सरकारकडून लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत. त्यांच्या सरकारची जगभरात प्रशंसा होत आहे. त्यामुळे देशात सकारात्मक अपेक्षांचे वादळ उठले आहे.
संतांकडून मोदींना काही प्रस्ताव दिलाय का?
- होय. अयोध्येचे संत गोपालदास महाराजांनी राममंदिराचा प्रस्ताव मोदींपुढे ठेवला आहे. देश अत्यंत योग्य दिशने पुढे जात आहे. त्या कामातही थोडा वेळ दिला पाहिजे, अशी साधू-संतांची भावना आहे. मात्र, आम्ही अन्य विषयाशी तुलना करतोय, असा त्याचा अर्थ मुळीच नाही. मोदी सरकारमुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकात्मता भाव जागृत झाला आहे.
पैशाच्या बळावर धर्मपरिवर्तनाचे अभियान योग्य आहे का?
- कोणालाही बळाचा वापर करून त्याचे धर्मपरिवर्तन कोणी करू शकतो, असे मला वाटत नाही. काही अडचणी, दबावाला बळी पडून धर्म व संस्कृती बदलली आहे, असे समाजात भरपूर लोक आहेत. त्यांना आपल्या पूर्वीच्या धर्मात यायचे असेल तर स्वागतच आहे. कोणतीही प्रक्रिया सहज झालेली चांगली असते. पैसा, बळाच्या जोरावर काम करणे हे हिंदू संस्कृतीचे काम नाहीच.
गंगेसोबतच गोदावरीचेही शुद्धीकरण व्हावे असे वाटते का?
- मोदींचे स्वच्छता अभियान चांगले आहे. गंगेसोबत गोदावरी नदीचेदेखील शुद्धीकरण व्हायला हवे. त्यासाठी आपण प्रस्ताव देऊ.मोदींमुळे मुस्लिम समाजात असुरक्षितेची भावना असल्याचे दिसते.
- मला असे काही वाटत नाही. कारण मोदींनी गुजरातवर कित्येक वर्षे राज्य केले. त्यांनी मुस्लिमांचाही विकास केला. निवडणुकीपूर्वी असे वाटणे ठीक आहे. मात्र आता घाबरण्याचे मुळीच कारण नाही. देशातून भय आणि भूक जाणे आवश्यक आहे.