आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vi Ce Chancellor Demanded 50 Crores, But Chief Minister Give Only 10 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरू पांढरीपांडे यांनी मागितले 50 कोटी, मुख्‍यमंत्र्यांनी दिले 10 कोटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कोल्हापूर विद्यापीठाप्रमाणेच 50 कोटींचा निधी देण्याची जाहीर मागणी एनयूएसएसडीच्या उद्घाटनासाठी आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सायन्स पार्कसाठी दहा कोटींची घोषणा करून सर्वांचा भ्रमनिरास केला. मराठवाड्याच्या वाट्याला सर्व काही शेवटी आणि सगळ्यांपेक्षा कमीच येते, अशी सार्वत्रिक खंत या वेळी व्यक्त केली गेली.

विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंट्स स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे (एनयूएसएसडी) उद्घाटन शुक्रवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत थाटात झाले. यावेळी संधी साधून कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी विद्यापीठाला 50 कोटी रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली. केंद्र सरकारच्या वतीने नऊ राज्यांतील दहा विद्यापीठांमध्ये ‘राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम’ (एनयूएसएसडी) राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात या विद्यापीठातून झाली. एक हजार विद्यार्थ्यांना 26 ऑगस्टपासून विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी (एनएसडीए), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात साक्षरतेचे प्रमाण 82 टक्क्यांपर्यंत गेले. गळतीचे प्रमाणही कमी झाले. मात्र, पुढचा गुणवत्तेचा टप्पा पार करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील 21 टक्के युवक उच्च शिक्षण घेतात. हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत निश्चितच जास्त आहे. मात्र, प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत असून त्या तुलनेत आपण खूप मागे आहोत. केवळ उच्च शिक्षण घेऊन उपयोग नसून युवकांच्या हाताला दर्जेदार व शिक्षणानुरूप काम मिळणे महत्त्वाचे आहे. अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्राच्या पदव्या घेऊन हजारो विद्यार्थी बाहेर पडतात; परंतु ते नोकरीयोग्य नसल्याचे व्यावसायिक व उद्योगपती सांगतात. त्यातच देशातील 95 टक्के युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळत नाही. याच व्यापक उद्देशाने पंतप्रधान मनमोहसिंग यांनी ‘टाटा’च्या सहकार्याने कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्य विकास कार्यक्रम सुरू राहील. मात्र, मार्केटमधील गरज आणि अभ्यासक्रमातील ‘मिसमॅच’ दूर करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

बुद्धिकौशल्यावरच देश महासत्ता
आपला देश नैसर्गिक साधनसंपत्तीवर जगू शकत नाही. आपल्याला 85 टक्के तेल आयात करावे लागते. ऑटोमोबाइल क्षेत्र आणि निर्यातीमध्येही स्लोडाऊन असल्याने वेगवेगळे परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर बुद्धिकौशल्यावरच देश उभा राहू शकेल आणि महासत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. 82 टक्के कोरडवाहू शेती शाश्वत करणे, औद्योगिक विषमता दूर करणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, हे आपल्यासमोर आव्हान असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

कुशल युवक निर्मितीचे ध्येय
या अभ्यासक्रमामुळे शिक्षणाला कौशल्याची जोड मिळाल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले. डी. पी. सावंत म्हणाले, 2022मध्ये 50 कोटी ‘एम्प्लॉयेबल ग्रॅज्युएट्स’ अर्थात कुशल युवक निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे ध्येय आहे. त्यामुळेच हा पायलट प्रोजेक्ट सुरू होत असून सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमस्थळी विस्कळीतपणा
नाट्यगृहात प्रत्येक गेटवर पोलिस, ‘टाटा’, ‘एनएसडीए’चे कर्मचारी अधिक आणि विद्यापीठाचे कर्मचारी कमी होते. नाट्यगृहात प्रवेश करणार्‍यांना नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, काही गेटवर श्रोत्यांना ताटकळत ठेवण्यात आले होते. नोंदणी होत नव्हती आणि आतही सोडले जात नव्हते. विस्कळीतपणामुळे अनेकांना नाट्यगृहात जाता आले नाही.


दिग्गजांची उपस्थिती : विद्यापीठाच्या नाट्यगृहातील व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, ‘एनएसडीए’चे अध्यक्ष एस. रामदुराई व अनिता राजन, ‘टाटा इन्स्टिट्यूट’चे संचालक प्रा. एस. परशुरामन, कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे अखिलेश चौहान आदींची उपस्थिती होती.
या वेळी रामदुराई, अनिता राजन, परशुरामन यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कुलसचिव डॉ. माने यांनी आभार मानले.