आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापूरमार्गे नाशिककडे जाणाऱ्या बसगाड्या बंद; नाशिकच्या तळेगावातील हिंसक अांदोलनाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी येथील एका पाच वर्षांच्या बालिकेवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराने चांगला गोंधळ उडाला आहे. - Divya Marathi
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी येथील एका पाच वर्षांच्या बालिकेवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराने चांगला गोंधळ उडाला आहे.
वैजापूर - नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथील अत्याचार प्रकरणी हिंसक आंदोलनामुळे वैजापूरमार्गे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोमवारी दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारीही काही प्रमाणात बसेस बंद होत्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली तर या संधीचे सोने करत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले.
दिवसभरात वैजापूरहून नाशिकला जाणाऱ्या ७ बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्या वैजापूरहूनच माघारी पाठविण्यात येत आहेत. यामुळे महामंडळाचा हजारो रुपयांचा महसूल बुडाला. नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी रस्त्यावर उतरलेला जमाव रविवारी हिंसक झाला होता. या जमावाने वेगवेगळ्या मार्गावर ७ एसटी बसेस पेटवून दिल्या होत्या. या आंदोलनाची तीव्रता पाहता परिवहन महामंडळाने नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहे. वैजापूर बस स्थानकातून नाशिककडे ७ बसेस रोज ये- जा करीत असतात. सोमवारी या सातही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच वाशीम- नाशिक, रिसोड- नाशिक, कळमनुरी- नाशिक, लोणार- नाशिक, वाशीम- नालासोपारा, औरंगाबाद - नाशिक, चिखली - नाशिक, औरंगाबाद - बोरीवली, यवतमाळ - मुंबई या लांब पल्ल्याच्या बसेस वैजापूर बसस्थानकातून माघारी फिरविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रक संदीप बागुल यांनी दिली. दरम्यान यामुळे नाशिक व त्या मार्गाकडे जाणाऱ्या सुमारे एक हजार प्रवाशांना याचा फटका बसला. तर महामंडळालाही हजारो रुपयांचा महसूलावर पाणी सोडावे लागले. दरम्यान या बसेस कधी सुरू होतील याबाबत वाहतूक कक्षाकडे कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. दरम्यान ऐन नवरात्रोत्सवात येवला तालुक्यातील कोटमगाव व वणी येथील देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.
बातम्या आणखी आहेत...