आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chanceller Dr Vijay Pandharipande Speaks On Research

संशोधनासाठी मिळेल वाट्टेल तेवढा निधी : डॉ. पांढरीपांडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी मिळाल्यामुळे ‘यूजीसी’सह अनेक ठिकाणांहून निधीचा स्रोत वाढणार आहे. नवनवीन विषयांमध्ये संशोधनाला फार मोठी संधी असून, त्यासाठी वाट्टेल तेवढा निधी मिळू शकतो. मात्र, क्षमता सिद्ध कराव्या लागतील, वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे संशोधनासाठी अनेक अभ्यासकांना एकत्र यावे लागेल. याचाच अर्थ अभिनव काम करावे लागेल आणि त्याचे मार्केटिंगही करावे लागेल, असे स्पष्ट मत कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘अ’ श्रेणीमुळे अनेक विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. ‘यूजीसी’च्या 12 व्या योजनेनुसार वाढीव निधी मिळणार आहे. तसेच ‘इनोव्हेशन प्रोग्राम’अंतर्गत नवनवीन विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी पायाभूत उभारणीपासून ते प्रकल्पापर्यंतचा लागणारा सगळा खर्च निधीद्वारे मिळू शकतो. आता नॅनोटेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीसारख्या नवीन विषयांतील संशोधनात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसायन्सेस आणि इतरही शाखांचे अभ्यासक एकत्र येऊन संशोधन करतात. अशा प्रकारच्या संशोधनाला आपल्या विद्यापीठामध्ये आता मोठी संधी मिळणार आहे.

‘थ्रस्‍ट एरिया’ला द्यावे लागेल प्राधान्य
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे वेळोवेळी ‘थ्रस्ट एरिया’ अर्थात देशाच्या गरजेनुसार सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेला विशिष्ट विषय किंवा क्षेत्र घोषित होते. मग तो विषय पर्यावरणाचा असेल किंवा अपारंपरिक ऊर्जेचा. त्यानुसार त्या त्या क्षेत्रात संशोधनाला प्राधान्य दिले जाते. त्या प्राधान्य क्रमानुसार विद्यापीठामध्ये संशोधनाचे प्रकल्प हाती घेता येऊ शकतात. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाला अपेक्षित प्रकल्प हाती घेतल्यास आणि तशी योग्यता सिद्ध केल्यास संशोधनाला हवा तेवढा निधी मिळू शकतो. त्याचप्रमाणे देशातील किंवा देशाबाहेरील अनेक संस्थांना आज वेगवेगळ्या क्षेत्रांत संशोधन करून हवे आहे. अशा संस्थांकडूनही पाहिजे तेवढे फंड्स मिळू शकतात. याच वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचा मराठवाड्याला लाभ होऊ शकतो. विद्यापीठाचा विकासही यातच दडलेला आहे.

आपसूक काहीच मिळणार नाही
‘अ’ श्रेणी मिळाली म्हणून विद्यापीठाला आपसूक काहीच मिळणार नाही. प्रत्येक नवीन गोष्टीसाठी स्वत:ला आधी सिद्ध करावे लागेल, क्षमता-योग्यता-कल्पनाशक्तीच्या जोरावर विश्वास मिळवावा लागेल. त्याचे मार्केटिंगही करावे लागेल. तेव्हाच अधिकाधिक प्रकल्प येतील, असेही डॉ. पांढरीपांडे म्हणाले. त्याच वेळी विद्यापीठ स्वखर्चाने चालवत असलेल्या विभागांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.