आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंनीच बदलले नियुक्तीबाबतचे निकष, ओएसडी पदावर केली अपात्र उमेदवाराची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्राचा सुसंवाद असावा म्हणून ‘युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरअॅक्शन’ या नव्या विभागाच्या ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी पदाच्या नियुक्तीच्या नियमांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत:च बगल दिली आहे. जाहिरातीत पीएच.डी. अर्हतेची अट असताना कुलगुरूंनी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्याची नियुक्ती केली आहे. त्यांना इंग्रजी येते म्हणून आपण नियुक्ती दिल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटीअंतर्गत विद्यापीठाला अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी व दोन्ही घटकांमध्ये सुसंवाद असावा म्हणून कुलगुरूंनी युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरअॅक्शन सेलची निर्मिती केली असून त्यासाठी ओएसडी पद निर्माण केले आहे. यासाठी ६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले होते. या पदासाठी एम.एस्सी.अथवा एम.टेक.आणि पीएच.डी. अर्हताप्राप्त व्यक्तींनीच अर्ज करावेत, असे जाहिरातीत नमूद केले होते. कुलगुरूंनी स्वत: १० जूनला घेतलेल्या मुलाखतींसाठी १७ उमेदवार उपस्थित होते. यापैकी सहा उमेदवारांनी पीएच.डी. अर्हताप्राप्त केलेली होती. तरीही जाहिरातीत दिलेल्या निकषाला बगल देऊन कुलगुरूंनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पीएच.डी. करणारे संशोधक विद्यार्थी निवृत्ती गजभरे यांची पाच वषार्साठी ओएसडी म्हणून नेमणूक केली आहे. या पदासाठी दरमहा पन्नास हजारांचे एकत्रित वेतन निश्चित केले आहे.

नोकरी करणार की पीएच.डी. संशोधन?
विद्यापीठ निधीतून गजभरे यांना पाच वर्षात वेतनापोटी ३० लाख रुपये देण्यात येईल. पण पीएच.डी. नसतानाही कुलगुरूंनी त्यांना संधी दिली आहे. गजभरे आता पुढील काळात नोकरी करतील की, पीएच.डी. संशोधन करतील असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठ अध्यक्ष अमोल दांडगे यांनी उपस्थित केला आहे. दांडगे यांनी गजभरे यांच्या हकालपट्टीची कुलगुरूंकडे मागणीदेखील केली आहे.

पीएच.डी. धारकांना इंग्रजी येत नव्हते
प्रश्न : पीएच.डी. धारकांचे अर्ज असताना नॉन पीएच.डी. ला नियुक्ती दिली का..?
कुलगुरू : होय, पीएच.डी. धारकांचे अर्ज होते, मात्र त्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. गजभरेंना इंग्रजी येते, म्हणून नियुक्ती दिली.
प्रश्न : आपणच पात्रता ठरवली व आपणच केराची टोपली दाखवली, का?
कुलगुरू : कंपन्यांच्या सीईओ, एमडींसोबत इंग्रजीतून संवाद होणार आहे. त्यामुळे योग्य व्यक्ती पदावर पाहिजे.
प्रश्न : आपण चुकीचे पायंडे पाडता आहात
कुलगुरू : व्हाइस चान्सलर म्हणून मला सर्वाधिकार आहेत, त्यामुळे मीच शिथिलता दिली. त्यात काहीच गैर नाही. नियुक्त व्यक्ती योग्य काम करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...