आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Dr.B. A. Chopde,Latest News In Divya Marathi

सारेच म्हणतात, कुलगुरू आमचे नातेवाईक आहेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे संशोधक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे मूळ कराडचे. एमएस्सी सूक्ष्मजीवशास्त्र ही पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केली. नॉटिंगहॅम इंग्लंड विद्यापीठातून पीएचडी मिळवली.शिकागोच्या विद्यापीठात डॉक्टरेट केली. त्यानंतर मुंबई, पुणे असा त्यांचा प्रवास. तरी पण विविध राजकीय पक्ष, संघटना आणि विद्यार्थी नेते चोपडे साहेब तर आमचे पाहुणे आहेत, असे म्हणत आहेत. अशा गमतींना विद्यापीठाच्या वर्तुळात रंगत आली आहे.
कुलगुरूंचे दिवसभर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे. अनेक हौशी कार्यकर्ते फोटोसेशनही करत आहेत. कुलगुरूंच्या केबिनमधून बाहेर पडताच ‘अपना तो काम बनेगा बॉस, कुलगुरू तो अपने रिशतेदार है!’ तर काही जण कुलगुरू चळवळीतले असल्यामुळे त्यांच्याशी आपली जुनीच ओळख आहे, असे म्हणत आहेत. आपली पोळी भाजून घेण्यासाठी कुलगुरूंसोबत नाते जोडण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे.
बॅक्टेरिअल जेनेटिक्स, मॉलेक्युलर बायोलॉजी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स इंजिनिअरिंग हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी 60 हून अधिक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय जर्नल्समध्ये लेख, परिसंवादामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंट्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. पुणे विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख तसेच बायोटेक्नॉलॉजी व बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे.
विदेश, पश्चिम महाराष्‍ट्र आणि पुणे, मुंबई असा प्रवास करणारे कुलगुरू मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे नातेवाईक कसे, या प्रश्नाला घेऊन सध्या विद्यापीठात चर्चेला उधाण आले आहे. डॉ. चोपडे आड पडदा ठेवणारे नाहीत. जे त्यांना भेटण्यासाठी जातात त्यांची निराशा करत नाहीत. त्यांच्या एकूणच मनमिळावू आणि सरळ स्वभाचे काही कार्यकर्ते भांडवल करताना दिसून येत आहेत.