आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Dr. B.A.Chopde,Latest News In Divya Marathi

डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेच्या उंचीइतके विद्यापीठाचे कार्य झाले पाहिजे- कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेच्या उंचीइतके कार्य येथील विद्यापीठाचे झालेच पाहिजे, यासाठी माझे नेटाने प्रयत्न राहतील’, असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी काढले. संत तुकाराम नाट्यगृहात सम्यक बौद्ध उपासक -उपासिका महासंघाच्या वतीने कुलगुरू डॉ. चोपडे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू म्हणाले, ज्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची आणि सामाजिक संघर्षाची परंपरा लाभली आहे, अशा विद्यापीठात माझी निवड झाल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे मला वाटले.
या देशात सर्वप्रथम बौद्ध तत्त्वज्ञानाने विद्यापीठाची प्रणाली दिली. या विद्यापीठाचा लौकिक वाढावा, या दिशेने मी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अँटिकरप्शनचे पोलिस उपअधीक्षक प्रवीणकुमार मोरे, अ‍ॅड. रमेश जोगदंड, बहुजन कास्ट्राइब महासंघाचे अध्यक्ष बी. आर. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते डॉ. चोपडे आणि त्यांच्या पत्नी नीलिमा चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते बहुजन समाजातील दहावी आणि बारावी इयत्तेत विशेष प्रावीण्य मिळवणा-या 98 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल रमेश बनसोड, मनपातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकला गायकवाड, लंडन येथे वास्तव्यास असलेल्या दीक्षा पूर्णे, दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कार्यरत असलेल्या सलोनी उने यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे, तर आभार कैलास कांबळे यांनी मानले.