आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामचुकार प्राध्यापकांवर आता सॉफ्टवेअरचा "वॉचडॉग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात टीचिंग-लर्निंग प्रोसेस होत नाही, अशी नेहमी ओरड केली जाते. यावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी भन्नाट तोडगा काढला आहे. कामचुकार प्राध्यापकांवर ‘वॉचडॉग’ म्हणून भूमिका बजावण्यासाठी ‘अकॅडमिक मॉनेटरिंग सॉफ्टवेअर’ तयार करून घेतले जात आहे. तासिकांवर देखरेख, वेळापत्रक ठरवणे, कोणता विषय शिकवणार याबाबतची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये गुरुजींना भरावी लागणार आहे. शिवाय दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मोबाइलवर एसएमस पाठवता येईल.
वर्गात जाताना अन् तासिका संपल्यानंतर प्रत्येकाचे बायोमॅट्रिक घेऊन गुरुजींसह विद्यार्थ्यांनाही आता वर्गात बसणे बंधनकारक होणार आहे. विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांचे काही प्राध्यापक महिनाभरातून एखाद दुसराच तास घेतात, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. याचा थेट गुणवत्तेवर परिणाम होतो. विशेषत: आता चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम (बीसीसीएस) मुळे जगातील सर्व विद्यापीठांच्या गुणवत्तेशी आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे. मात्र कॅम्पसमध्ये वर्गच होत नसतील तर उच्चशिक्षणात गुणवत्ता कशी काय राहील..? कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी यावर प्रभावी उपाय शोधला आहे. ‘अकॅडमिक मॉनेटरिंग सॉफ्टवेअर’ च्या माध्यमातून विद्यार्थी आणि गुरुजी यांच्यावर ‘वॉचडॉग’ म्हणून हे सॉफ्टवेअर काम करणार आहे. नागपूरमधील खासगी कंपनीकडून एक लाख रुपये खर्च करून सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. विभागातील तासिकांचे संपूर्ण मॉनेटरिंग करणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर रसायन तंत्रज्ञान विभागात हे सॉफ्टवेअर बसवले जाणार आहे. नंतर सर्व विभागांत बसविण्यात येईल. हे सॉफ्टवेअर इंटरनेटशी जोडले जाईल. तासिकेला जाण्यापूर्वी आपण आज कोणता विषय शिकवणार, त्याबाबत आपण काय तयारी केली आहे. याची इत्थंभूत माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षकांसह विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.

पालकांच्या मोबाइलवर विभागाकडून एसएमएस
सर्वविभागातील डाटा संकलित होऊन कुलगुरूंच्या दालनात असलेल्या मॉनिटरवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे शिक्षकांची अकाउंटीबिलिटी राहील, असा विश्वास कुलगुरूंना आहे. विभागातील शिक्षक, विद्यार्थी यांना स्वतंत्र आयडी, पासवर्ड दिला जाईल. ज्यामुळे प्रत्येकाला आपल्या तासिकांची माहिती, त्याचे वेळापत्रक कळण्याची सोय होईल. यासह तासिकांचा अहवाल विभागाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांनाही एसएमएसद्वारे पाठवला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात जातो का..? याची माहिती पालकांना उपलब्ध करून दिली जाईल. तासिका घेणाऱ्या शिक्षकांचे वेळप्रसंगी पगारही रोखण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले.