आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक संमेलनासाठी कुलगुरू डॉ. चोपडे बांगलादेशला जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना ढाकाच्या जागतिक सामाजिक विकास संमेलनाचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. त्यामुळे २७ ते २९ मेदरम्यान ते बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. बांगलादेशात ग्रामीण बँकांच्या माध्यमातून अर्थक्रांती करणारे नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांना विद्यापीठात येण्याचे निमंत्रणही देणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळात १२ ते १७ मेदरम्यान कुलगुरू जपानला जाणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक असल्यामुळे जपान दौरा आता जुलैपर्यंत लांबला आहे. जपानमधील कोयासन बुद्धिझम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी जपान दौरा नियोजित होता. त्याऐवजी कुलगुरू आता ‘सामाजिक विकास’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी बांगलादेशला जाणार आहेत. नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांनीच हे संमेलन आयोजित केले आहे. मागील वर्षी ३० देशांतील ११०० प्रतिनिधींनी संमेलनात सहभाग घेतला होता. या वर्षी भारतातून कुलगुरू डॉ. चोपडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ४५ देशांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सामाजिक विकास या विषयावर विविध देशांतून आलेल्या मान्यवरांची भाषणे होणार आहेत.