आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Less Options For Registrar Selection Committee

तांत्रिक पेच: कुलसचिव निवड समितीसाठी कुलगुरूंसमोर पर्याय कमीच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवदासाठी २२ जानेवारी रोजी मुलाखती होत आहेत. मात्र, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यापुढे निवड समिती गठित करण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे खूप कमी ‘स्कोप’ आहे. अधिकार मंडळांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे शासकीय अधिकारी असलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना नियुक्त करणे अपरिहार्य आहे. परंतु, अधिष्ठातांऐवजी कुणाचा समावेश करायचा हा निर्णय मात्र झालेला नाही.

मागील वेळी ‘अप्रोप्रियट’ उमेदवार मिळाल्याचे सांगून २२ जुलै रोजी फक्त प्रक्रिया पूर्ण केली. आता २२ जानेवारी रोजी मुलाखती होणार आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ त्या कलम ७९ च्या (ब) (३) नुसार कुलसचिव निवड समितीत अधिष्ठातांपैकी एक सदस्य असणे अनिवार्य आहे. पण ३१ ऑगस्ट रोजी अधिकार मंडळांच्या सदस्यांची मुदत संपल्यामुळे सर्व अधिष्ठातांची मुदत संपली. शिवाय कलम ७९ च्या (२) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांच्याही समावेशाची तरतूद आहे. पण व्यवस्थापन परिषदेच्या पदसिद्ध सातपैकी चार जणांचाच पर्याय उपलब्ध आहे. त्यात उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे किंवा त्यांचे प्रतिनिधी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. एस. के. महाजन किंवा त्यांचे प्रतिनिधी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. आर. माने आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांचा समावेश आहे. यांच्यापैकी डॉ. चहांदे आणि डॉ. काळे यांचा पर्याय कुलगुरू निवडू शकतात. तंत्रशिक्षण विभागाचे सचिव महाजन अथवा त्यांचे प्रतिनिधी सहसंचालक डॉ. महेश शिवणकर हाही पर्याय आहे. विद्यमान कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचा निवड समितीत समावेश केला जाऊ शकत नाही. अधिष्ठातांऐवजी कुणाचा समावेश करायचा, यासंदर्भात अस्थापना विभागाने कुलगुरूंकडे पर्याय सुचवले, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. दोन तज्ज्ञांमध्ये बाहेरील विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, किंवा बीसीयूडी संचालकांचा निवड समितीत समावेश करता येईल. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके, पुण्याचे डॉ. वासुदेव गाडे आणि डॉ. जळगावचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्यापैकी दोघांचा समावेश होईल. त्याशिवाय मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून कुलगुरू कुणाची निवड करतात याकडेही उमेदवारांचे लक्ष आहे.

डॉ. चहांदे पहिल्यांदाच विद्यापीठात येणार
विद्यापीठाच्याव्यवस्थापन परिषदेच्या पदसिद्ध सदस्यांत उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतात. मात्र, आतापर्यंतच्या एकाही बैठकीला त्यांना साधे निमंत्रण पत्रही दिले गेले नाही. त्यामुळे प्रधान सचिव कधीही बैठकीसाठी आल्याचे ऐकिवात नाही, पण आता कुलसचिव निवड प्रक्रियेसाठी ते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकतर डॉ. चहांदे अथवा उपसचिव सिद्धार्थ खरात यांच्याकडे येण्याबाबत विचारणा होऊ शकते.