आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे उपराष्‍ट्रपती पोहोचले सिल्लोडमध्‍ये, समजून घेतली भारतीय कुटुंब व्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड/औरंगाबाद - मुलीच्या लग्नात दिल्या जाणाऱ्या हुंड्याबाबत चीनचे उपाध्यक्ष ली युआनचाओ यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत हा पैसा विकासासाठी खर्च करावा, असा सल्ला सिल्लोड येथील शिक्षक माधव साेमवंशी यांना बुधवारी दिला. या भेटीत त्यांनी किचनपासून ते बेडरूमपर्यंतची रचना प्रत्यक्ष बघितली. घरातला कारभार कसा चालतो, अादी प्रश्न विचारत युआनचाओ यांनी सोमवंशी यांच्याकडून भारतीय कुटुंबव्यवस्थेची वैशिष्ट्ये जाणून घेतली.

युअानचाअाे यांना भारतीय कुटुंबव्यवस्थेबद्दल जाणून घ्यायचे अाहे, असे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाचे प्रमुख विकासकुमार यांना सांगण्यात अाले. त्यांनी त्यांचे मित्र प्रा. मदन सुर्यवंशी यांचे नाव सुचवले. त्यांनी त्यांचे नातेवाईक व अजिंठा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक असलेल्या माधव सोमवंशी यांची शिफारस केली अाणि युअानचाअाेचा ताफा सिल्लाेडच्या टिळकनगरातील साेमवंशींच्या घरी पाेहचला.

रात्री साडेबारा वाजता आला फोन
मंगळवारी रात्री साडेबारा वाजता सोमवंशी यांना पोलीस अधिकाऱ्याकडून फोन आला. तुमचा पत्ता काय? कुठे नोकरी करता याबाबती सारी माहिती त्यांना विचारली. त्यानंतर तुमच्याकडे उपाध्यक्ष येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बुधवारी २ वाजून ४५ मिनिटांनी युआंचो सोमवंशींच्या टिळकनगरातील घरी पोहोचले. यावेळी परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परराष्ट्र मंत्रालयाकडून घेतली परवानगी
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास चीनच्या शिष्टमंडळाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवंशी यांच्या भेटीची रीतसर परवानगी घेतली. ती मिळाल्यानंतर वेगाने सूत्रे हलवण्यात आली. त्यामुळे उपाध्यक्षांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाले. रामा हॉटेलमध्ये होणारी दुपारी साडेतीन वाजता मनपाच्या शिष्टमंडळासोबत होणारी बैठक सायंकाळी पाच वाजता झाली.

मुलीला म्हणाले, चांगला जाॅब मिळेल
युआनचाअाे यांनी दुभाषांच्या मदतीने ३५ मिनिटे गप्पा मारल्या. गॅस सबसिडी कशी मिळते, कुटुंबात किती व्यक्ती असतात, दोनपेक्षा जास्त मुले असल्यास पालनपोषण कसे करता, असे प्रश्न त्यांनी विचारले. सोमवंशी यांच्या मुलीला तू पदव्युत्तर शिक्षण भारतात घेणार की चीनमध्ये ? असे विचारले. तिने उत्तर देताच ‘तुला चांगला जाॅब मिळेल,’ अशा शब्दांत त्यांनी तिला अाशीर्वादही दिला.

सौरऊर्जेवर पाणी का तापवत नाहीत?
युआनचाअाे यांनी सोमवंशींच्या देवघराचीही पाहणी केली. रोज देवपूजा कशी केली जाते, हेही जाणून घेतले. मग ते थेट बाथरूममध्ये शिरले. अंघोळीचे पाणी गॅसवर तापवले जाते, असे सोमवंशींनी सांगितल्यावर तुमच्याकडे सौरऊर्जेची यंत्रणा नाही का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.