आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहामांडवात इच्छुकांची जास्त संख्या ठरली पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी अंबड - विहामांडवा जिल्हा परिषद गट व विहामांडवा, नवगाव गणात उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. पक्षश्रेष्ठी बैठका घेऊन इच्छुक उमेदवार व मतदारांची मते जाणून घेत आहेत. ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, अशा इच्छुकांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
विहामांडवा जिल्हा परिषद गटात विहामांडवा व नवगाव हे पंचायत समिती गण आहेत. विहामांडवा गट सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. विहामांडवा गण सर्वसाधारण महिला प्रवर्ग तर नवगाव गण ओबीसी प्रगर्वातील पुरुषासाठी राखीव आहे.विहामांडवा गटात 22 हजार मतदार आहेत.
मागील 15 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रथमच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. या वेळी युवकांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळेल.
निवडणुकीसाठी सेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली नसल्याने सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या प्रमुख पाच पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.या निवडणुकीतही सर्वच पक्षांत गटबाजी उफाळून येऊन बंडखोरी होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठी बैठका घेऊन मतदारांची मते जाणून घेत आहेत. पैठण तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गण आहेत. महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्याने 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती सदस्य महिला होणार आहेत. सध्या पैठण तालुक्यात कडाक्याच्या थंडीत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. हॉटेल, शेकोट्यांवर निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. मागील दहा वर्षांपासून विहामांडवा गट अनिल जाधव यांच्या ताब्यात होता. या निवडणुकीत अनिल जाधव हॅट्ट्रिक करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विहामांडवा गटातील इच्छुक उमेदवार - विहामांडवा गटातून राष्ट्रवादीकडून माजी जि.प.सदस्य अनिल जाधव, विहामांडव्याचे उपसरपंच संजयराजे निंबाळकर, पंचायत समितीचे गटनेते डॉ. गुलदाद पठाण, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष विष्णू वाकडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पन्हाळकर, हिरडपुरीचे सरपंच भागवत तांबे आदी इच्छुक आहेत. भाजपकडून तालुका उपाध्यक्ष दत्ता वाकडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भांड, माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांचे जावई कल्याण सोहळे इच्छुक आहेत. काँग्रेसतर्फे प्रदेश सरचिटणीस विनोद तांबे, माजी सरपंच विठ्ठल वाकडे, तर शिवसेनेतर्फे विलास भुमरे, सुरेश दुबाले, संजय कुलकर्णी आणि मनसेतर्फे माजी सरपंच शिवाजी नरके, विजयसिंग बोडखे हे इच्छुक आहेत.
नवगाव गणातील इच्छुक - शिवसेनेतर्फे केदारनाथ काळे, साहेबराव दगडखैर, राष्ट्रवादीकडून निवेश भावले, सतीश आंधळे, निवृत्ती पोकळे, काँग्रेसतर्फे बाबासाहेब पवार, मनसेतर्फे कारभारी निर्मळ हे इच्छुक आहेत.