आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय औताडे कृउबाच्या सभापतीपदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभापती-उपसभापतींच्या विजयाचा जल्लोष. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
सभापती-उपसभापतींच्या विजयाचा जल्लोष. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - जिल्हाकृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापतिपदासाठी बुधवारी (५ ऑगस्ट) अटीतटीची निवडणूक झाली. सभापतिपदी काँग्रेसचे संजय औताडे, तर उपसभापतिपदी भाजपचे भागचंद ठोंबरे यांची वर्णी लागली. निवडणुकीत चारही सदस्यांना नऊ- नऊ अशी समान मते मिळाल्याने शेवटी चिठ्ठी पद्धतीने कौल घ्यावा लागला.
बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. काँग्रेसकडून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार संजय औताडे यांनी अर्ज भरला. त्यामुळे गणेश दहिहंडे यांनी बंडखोरी केली. या संधीचे सोने करण्यासाठी भाजपने त्यांना आपल्या गोटात ओढून त्यांचा अर्ज भरला. व्यापारी संघाचे दोन सदस्य शेवटपर्यंत भाजपच्या गोटात राहिले. काँग्रेसचे दहिहंडे ऐन वेळेवर भाजपत गेले. अपक्ष सदस्य औताडे काँग्रेसमध्ये आले. यामुळे दोन्ही पक्षांची सदस्य संख्या सात- सात अशी समान झाली. व्यापारी मधील दोन सदस्य हरिशंकर दायमा प्रशांत साकिया यांनी गणेश दहिहंडे यांना, तर हमाल-मापाडी सदस्य देविदास कीर्तिशाही भाजपचे बंडखोर सदस्य विकास दांडगे यांनी औताडे यांना समर्थन दिले. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्तव्य विठोरे हिच्या हस्ते चिठ्ठी काढली. यात औताडे विजयी. उपसभापतिपदासाठी काँग्रेसचे नारायण मते भाजपचे भागचंद ठोंबरे यांनाही समान मते मिळाली. चिठ्ठीत ठोंबरे विजयी झाले. दीड वाजता सहायक निबंधक तथा निवडणूक अधिकारी श्रीराम सोन्ने यांनी दोन्ही पदांचा निकाल जाहीर केला. सोन्ने एफ. डी. बहुरे, आर. के. आर्य, सी. डी. मोटे, यशवंत देवकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
डॉ. काळे यांची विजयी मिरवणूक
निकालानंतर कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आतषबाजी केली. गुलाल उधळून एकच जल्लोष केला. डॉ. काळे यांच्या नावाने विजयी घोषणा दिल्या. नवनिर्वाचित सभापती औताडे, डॉ. काळे, आमदार सुभाष झांबड यांना पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली.
जनमताचा कौल
संस्थेवर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच आम्ही लढलो. त्यात जनमत ईश्वरी कौल आम्हाला मिळाला. अपक्ष सदस्यांनाही सोबत घेतले. औताडे काँग्रेसचे सदस्य झाले आहेत. आमच्या विचारांचा विजय झाला. लवकरच बाजार समितीच्या विकासासाठी मॉडेल प्लॅन तयार केला जाईल.
डॉ. कल्याण काळे, माजी आमदार.

ईश्वराची इच्छा
भाजप पदाधिकाऱ्यांनी काही कारण नसताना मला नाकारले. त्यामुळे अपक्ष लढलो. मतदारांनी मला सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. यापुढे सर्वांच्या विचाराने बाजार समितीचा सर्वांगीण विकास केला जाईल. जुना मोंढा स्थलांतरित करण्यावर भर देणार आहे.
संजय औताडे, नवनिर्वाचित सभापती
भूलथापांना चपराक
भाजपने भूलथापा मारून देशात राज्यात सत्ता स्थापन केली. प्रत्यक्ष कृतीत काहीच केले नाही. परिणामी, स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साथ भाजपला लाथाडले आहे.
सुभाष झांबड, आमदार, काँग्रेस.
दैवाचा कौल
सभापतिपदाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत आम्ही लढलो, पण शेवटी चिठ्ठी पद्धतीचा कौल त्यांच्या बाजूने लागला. दैवाने आम्हाला उपसभापतिपदाचा कौल दिला, तो आम्हाला मान्य आहे.
राजू शिंदे, माजी सभापती तथा नगरसेवक, भाजप.

सोडत पद्धतीची वेळ १९९० मध्ये आली होती. त्या वेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे वडील वैजनाथराव काळे आणि शब्बीर पटेल यांच्यात चुरस होती. शेवटी सभापतिपदासाठी दोघांमध्ये टाय आला आणि सोडत पद्धतीत शब्बीर पटेल यांचा विजय झाला. आजही संजय औताडे विरुद्ध गणेश दहिहंडे यांच्या नशिबाचा खेळ झाला आणि या खेळात औताडे यांनी बाजी मारली.

माझा गेम केला : विकास दांडगे
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपणास कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती करतो असे म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब दहिहंडे भागचंद ठोंबरे यांच्यामार्फत शब्द दिला होता. त्यांच्या शब्दाखातर आपण संजय औताडे हमाल मापाडीचे एक सदस्य असे तिघे जण आणले होते, परंतु रात्री १२ वाजेपर्यंत आपणास बसवून ठेवण्यात आले. मी भाजपचा जिल्हा सरचिटणीस असून जनसंघापासून भाजपमध्ये आहे. असे असताना ऐनवेळी काँग्रेस उमेदवार आयात केला. औताडे भाजप बंडखोर असल्याने आपण त्यांना मतदान केल्याचे विकास दांडगे यांनी सांगितले. या वृत्तास भाऊसाहेब दहिहंडे यांनी दुजोरा दिला असून विकास दांडगेंच्या मागे औताडे असल्याने व्यापारी गटातील दोन सदस्यांनी दांडगेंना विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...