आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणामुळेच उभारू शकलो जात पंचायतीविरोधात लढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोपाळ समाजातील जात पंचायत मोडून काढण्यासाठी जिद्दीने लढा उभारणारे विजय दिलीप चव्हाण. आदेश झुगारण्याच्या त्यांच्या बाणेदारपणापुढे पंचायतीला झुकावे लागले. दंड, जात बहिष्कार किंवा वाळीत टाकण्याचे काम आम्ही करणार नाही, असे पंचायतीने पोलिस, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समाजासमोर जाहीर केले. शिकलो होतो, म्हणूनच हा लढा लढू शकलो, असे चव्हाण म्हणतात. त्यांच्याशी केलेली थेट बातचीत...
गोपाळ समाजातील कुप्रथा मोडून काढणाऱ्या विजय चव्हाणांचे मत
प्रश्न : अापले शिक्षण कितीपर्यंत आणि कुठे झाले ?
- सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले पेर्ले हे माझे मूळ गाव. साताऱ्याजवळील औंधला शाळेत होतो. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताऱ्यात आलो. ‘कमवा शिका योजने’त सहभाग घेऊन बी.ए. झालो. आता इतिहास विषयात एम.ए. करतोय.

प्रश्न: गोपाळ समाजात शिक्षणाचे सरासरी प्रमाण कसे आहे?
- माझे छाेटेसे गाव पेर्ले २९० लोकवस्तीचे आहे. या गावात माझ्यासह केवळ पाच-सहा जणच पदवीधर आहेत. सात-आठ मुली २०-२२ मुले बारावीपर्यंत पोहोचू शकले आहेत. या भागातील लाेकांवर अंधश्रद्धा आणि जात पंचायतीचा पगडा खूप आहे. अगदी शिकत असलेल्या मुलांवरही.

प्रश्न: जात पंचायतीची व्यवस्था सदोष असल्याची जाणीव कधी झाली?
- दहावीच्या वर्गात मी शिकत असतानाच जात पंचायतीच्या निकालांबाबत माझ्या मनात प्रश्न पडू लागले. बारावीत असताना आम्ही काही मित्र या व्यवस्थेबद्दल चर्चा करत असू. या पंचायतीकडून देण्यात येणारे निकाल अयोग्य असल्याचे अाम्हा सर्वांचेच मत असायचे. मात्र, काही लाेकांकडून अाम्हाला गप्प बसायला सांगितले जायचे. दुसऱ्यांच्या तंट्यात मी मते मांडत होतो, पण ते लोक जात पंचायतीचे निर्णयच मान्य करत होते. तोंडावर मला चांगले म्हणायचे, पण निर्णयाच्या वेळी माझ्याविरोधात जायचे.

प्रश्न: मग ही कोंडी फुटली कशी?
- शेरेशेणवलीत दिलेल्या माझ्या बहिणीचा पतीकडून छळ सुरू होता. दारू पिऊन तो तिला त्रास द्यायचा. माझे वडील, चुलत्यांनी समजावून सांगितले; पण फरक पडला नाही. अखेर जात पंचायत बोलावून समज देण्याचे ठरले. पंचांनी आम्हाला बहिणीच्या सासरच्यांना ४० हजार रुपये मागितले. पैसे दिल्यावरच निकाल देऊ, असे म्हटले. वडिलांच्या बोलावण्यावरून मी साताऱ्याहून पेर्लेला आलो. जात पंचायत भरली. मी माझ्या काही मित्रांनी विरोधात बोलणे सुरू केले. तेव्हा मला धमक्या देऊन धक्काबुक्की करण्यात आली. ४० हजारांच्या रकमेत तडजोड झाली; पण मी जात पंचायत भरवण्याच्या विरोधात होतो. त्यामुळे आम्हालाच जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय पंचायतीने घेतला. मी साताऱ्याला परतलो. दोन दिवसांनी वडिलांनी पंचांची माफी मागितली आणि ३,४०० रुपये दंडही भरून पुन्हा जातीत प्रवेश केला. हे कळल्यावर मला हा निर्णय मान्य झाला नाही.

प्रश्न: मग पुढचा लढा कसा दिला?
- वडिलांनामी विरोध कळवला आणि उंब्रजचे पोलिस ठाणे गाठले; पण पोलिस संबंधितांविरुद्ध तक्रार मागत होते. मला घरच्यांची काळजी होती. मी त्यांना माझ्या नावाशिवाय तक्रार घेण्याची विनंती केली. त्यांना ते मान्य नव्हते. अखेर माझ्या म्हणण्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी गावच्या पोलिस पाटलांना फोन केला. पाटलांनी थेट पंचांना घटनेचा तपशील विचारला. त्याने झाले असे की, मी पोलिसांत तक्रार करतो आहे हे पंचांना, समाजाला कळले. मग मी उघड भूमिका घेतली. तक्रार नोंदवली, पण ज्या गतीने कारवाई व्हायला हवी होती तशी ती झाली नाही. त्यामुळे गावात आलो की माझा छळ सुरू झाला. घरच्यांना टोमणे मारणे सुरू झाले. आई-वडील, दाेन भाऊ मात्र माझ्या बाजूने राहिले.

प्रश्न: पुढेही काम सुरू ठेवणार काय?
- राज्यघटना,न्यायसंस्था असताना ही अशी समांतर न्यायव्यवस्था हवी कशाला हा विचार मी मांडतो आहे. इतिहासाचे वाचन मला प्रेरक आणि उपयोगी ठरत आहे. शिकून बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांनी मला फोन करून सोबत असल्याची हमी दिली आहे. गावात आमच्या समाजाची मंडळी एक तर मला टाळतात किंवा रागराग करतात; पण मी घाबरत नाही. त्यांनी मला मारहाण केली, पण मी सामंजस्याने बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. असा समाज आपल्याला नको, असे मी वडिलांना सांगितले होते आणि जात सोडायलाही तयार झालो होतो. पण बदल घडवायचा असेल तर जातीत राहूनच हे काम केले पाहिजे, असे सांगून वडिलांनी मला हिंमत दिली होती. समाज सुशिक्षित करायचा आहे. माझ्या परीने जमेल तेवढे काम मी नक्कीच करणार आहे.
...आणि लढाई जिंकलो!
पोलिसदाद देत नसल्याचे पाहून मी सातारा येथील अंनिस कार्यालयात गेलो. डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांना माहिती दिली. मला होणारी मारहाण, शाब्दिक छळ, कुटुंबाला होणारा त्रास कथन केला. त्यांनी मला पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडे जाण्यास सांगितले. मी गेले तेव्हाच सुदैवाने सर्व तालुक्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. देशमुख यांनी कराड उंब्रजच्या अधिकाऱ्यांना तातडीने योग्य ते निर्णय घेण्याचे आदेश तेथेच दिले. पुढे दोनच दिवसांत सर्व पंच, गोपाळ समाजासोबत मी, अंनिस कार्यकर्ते पोलिसांची बैठक झाली. त्यापूर्वीच अंनिस कार्यकर्त्यांनी माझ्या कामाची माहिती काढली होती. बैठकीत पंचांनी आम्हाला दिलेल्या आदेशांची कबुली दिली. यापुढे असे आदेश देणे, जात पंचायत भरवणे बंद करण्याचे लेखी दिले. तसेच जिल्ह्यातील इतर पंचायती बंद करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही दिली. मी माझा लढा जिंकलो होतो.