आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Zol Make A Half century, Indian Youth Team Won The Match

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा:विजय झोलचे अर्धशतक; भारतीय युवा संघ विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -कर्णधार विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी सलग दुसरा विजय मिळवला. भारताने दुबई येथे सुरू असलेल्या स्पर्धेत नेपाळवर 9 गड्यांनी मात केली. जालन्याचा विजय झोल (61 नाबाद) आणि अखिल हेरवाडकरच्या (71) शतकी भागीदारीच्या बळावर भारतीय युवा संघाने विजय मिळवला. संघाच्या विजयात पाच बळी घेऊन कुलदीप यादवने मोलाचे योगदान दिले. यापूर्वी भारताने सलामी सामन्यात संयुक्त अरब आमिरातचा पराभव केला होता.


प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 44.4 षटकांत सर्वबाद 136 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 25.1 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. अखिल हेरवाडकर व झोलने 133 धावांची भागीदारी केली. संघाला विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असताना हेरवाडकर बाद झाला. त्याने 67 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 71 धावा ठोकल्या. झोलने 82 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 61 धावांची विजयी खेळी केली. श्रेयस अय्यरने नाबाद 2 धावा जोडल्या.
संक्षिप्त धावफलक : (नेपाळ : सर्वबाद 136 धावा. पराभूत वि. भारत : 1 बाद 137 धावा)

कुलदीप यादवचे 5 बळी
भारताच्या कुलदीप यादवच्या मार्‍यापुढे नेपाळचा डाव 136 धावांवर गडगडला. थापाने 47 व आरेफ शेखने 40 धावा काढल्या. कुलदीपने 10 षटकांत 31 धावा देत 5 गडी बाद केले. कालिया व सरफराज शेखने प्रत्येकी 2 बळी घेतले.