आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Pandharipande News In Marathi, Vice Chancellor, BMAU, Aurangabad

स्वत:च्या मानापमानापेक्षाही संस्था मोठी, कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी व्यक्त केली भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कृष्णा भोगे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. विजय  - Divya Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कृष्णा भोगे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. विजय

औरंगाबाद - विद्यार्थी हाच आपला पक्ष, प्राध्यापक ही जात आणि शिकवणे हाच आपला धर्म आहे. आपण कधीही कोणत्याही कामात भेदभाव केला नाही. कारण स्वत:च्या मानापमानापेक्षाही मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही संस्था प्रतिष्ठेची वाटली. त्यामुळेच आपण टिकून काम करू शकलो, अशी भावना कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बुधवारी डॉ. पांढरीपांडे यांना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, डॉ. नीता पांढरीपांडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी भोगे यांच्या हस्ते पांढरीपांडे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.


पांढरीपांडे म्हणाले, विद्यापीठात आल्यावर मी केवळ ही एक संस्था न मानता आपले कुटुंब मानूनच कार्य करत गेलो. चांगल्या गोष्टी करत असताना वाईट प्रसंगही आले; परंतु सकारात्मक दृष्टीनेच त्यांना पाहिले. कधीही वाईट गोष्टींची वाच्यताही होऊ दिली नाही. एक कुलगुरू होण्याबरोबरच प्रथम एक शिक्षक असल्याचा मला अभिमान आहे. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. मात्र, आज प्राध्यापक म्हणून अभिमान बाळगण्यापेक्षाही अधिकारी, सिनेट मेंबर अशी बिरुदे मानण्यात धन्यता मानत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा, असा संदेशही कुलगुरूंनी दिला. या वेळी डॉ. प्रतिभा पाटील, बीसीयूडीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. झांबरे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. या वेळी त्यांनी कुलगुरूंच्या विविध योजनांमुळे विद्यापीठाला मिळालेल्या सुविधांचा उल्लेख केला. याप्रसंगी प्रा.गिरीश काळे यांनी बासरीवादन केले, तर मीरा राजपूत या विद्यार्थिनीने स्वागत गीत सादर केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
‘अ’ दर्जा सांभाळण्याची जबाबदारी भोगे : डॉ. पांढरीपांडे यांच्या काळात मिळालेला विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा राजकारणापेक्षा तो सांभाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केले.


कुलगुरूंच्या आयुष्यात चमत्कार
कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारताना आपल्या आयुष्यात तीन चमत्कार झाल्याचा उल्लेख करण्यास डॉ. पांढरीपांडे विसरले नाहीत. 3 वर्षे 2 महिने आणि 23 दिवसांच्या कालावधीत डॉ. पांढरीपांडे नावाचा कुलगुरू म्हणून विद्यापीठात आलो, हा पहिला चमत्कार. मानापमान सहन करत टिकून काम केले, हा दुसरा चमत्कार आणि आज सेवागौरव समारंभात सर्वांनी केलेले खुल्या दिलाने मनोगत, असे तीन चमत्कार आपणास अनुभवायला मिळाले, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

काही गोष्टी न बदलल्याची खंत
तीन वर्षांच्या कार्यकाळत आपण खूप चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी करू शकलो. चांगली माणसेही जोडली. मात्र, जे काही कमावले त्यापेक्षाही काहींना आपण बदलू शकलो नाही, याची खंत मनात राहील, असेही कुलगुरूंनी सांगितले.


वाहनचालकाचा गौरव
कुलगुरू म्हणून काम करताना अनेक वेळा प्रवासाचे योग आले. त्यात रात्रंदिवस सोबत असलेला वाहनचालक दिलीप बनकर याने सहकार्य केले. त्याच्या प्रामाणिक निष्ठेला सलाम करत माणुसकीचा प्रत्यय त्यांनी दिला. या वेळी आपल्या वाहनचालकाचा त्यांनी सत्कार केला.