आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपमानाचे कडू घोट प्यायल्यानेच मारली मोठ्या पदावर भरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चार वर्षांपूर्वी महापौरपद गेल्यावर सारा मानसन्मान एका क्षणात संपला. पक्षांतर्गत विरोधकांनी उचल खाल्ली. महत्त्वाच्या कार्यक्रमांना बोलावणे तर सोडाच, कार्यक्रमस्थळी आल्यावर सौजन्याची वागणूक देणेही कमी झाले.
शहराध्यक्षपद मिळू नये, अशी मोर्चेबांधणीही झाली. मात्र, अपमानाचे कडू घोट पिण्याची प्रचंड क्षमता असल्यामुळे त्या शांतपणे काम करत राहिल्या. राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळताच अंग झोकून काम केले. त्याचेच फळ त्यांना मिळाले आणि औरंगाबादच्या विजया रहाटकर भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या.
राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या घरात वाढलेल्या विजया मूळच्या नाशिकच्या रहिवासी. धावणी मोहल्ल्यात राहत असताना १९९५ मध्ये त्यांनी भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्यात त्या पराभूत झाल्या. मात्र, त्याने खचून न जाता पक्षाचे काम करत राहिल्या. २००० मध्ये ज्योतीनगर वॉर्डातून विजयी झाल्या. मात्र, पहिल्या सत्रात त्यांना पक्षाच्या पातळीवर फारशी ओळख मिळाली नाही. २००५ मध्ये त्यांनी ज्योतीनगर या खुल्या वॉर्डातून विजय मिळवला. तेथून त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण समोर आले. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी अशा दोन्ही गोटांत वावरण्याचे कसब त्यांनी प्राप्त केले. त्याअंतर्गत गडकरींच्या बाजूने असल्या तरी मुंडे गटालाही त्यांनी खुश ठेवले. त्यामुळे त्यांना मुंडेंनी औरंगाबादच्या महापौरपदाची संधी दिली. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिवसेनेशी संघर्षाचा पवित्रा घेतला. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.

राष्ट्रीय संधी : २०१० मध्ये महापौरपद गेल्यावर त्यांची खरी परीक्षा सुरू झाली. त्यांना शहराध्यक्षपद मिळू नये यासाठी लॉबिंग सुरू झाले. अपमानाचेही प्रसंग आले. तेव्हा अचानकपणे राष्ट्रीय कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी चालून आली. ज्या शहरात राजकारणाचा पाया ते शहर सोडून इतर िठकाणी काम करायचे की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. दिल्लीत काम कितपत जमेल, असेही वाटत होते. मात्र, एकदा संधी मिळाल्यावर झोकून देऊन काम करायची वृत्ती कामाला आली. महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा आणि आताच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरीने वेळप्रसंगी त्यांच्यापेक्षा जास्त काम केले.
दिल्लीच्या कार्यालयात देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना आदराची वागणूक देत त्यांच्याकडून काम करून घेण्यात त्यांना यश आले. त्याच काळात गुजरातला जाणे-येणे वाढले. नरेंद्र मोदी, अमित शहांशी चांगला परिचय झाला. सुदैवाने केंद्रात भाजपचे सरकार आले. इराणी मंत्री झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या काळात महिला आघाडी अध्यक्षा असलेल्या सरोज पांडे यांचा कार्यकाळ संपला. शहांकडे पक्षाची सूत्रे आली. तेव्हा महिला आघाडी अध्यक्षपदासाठी त्यांच्यापुढे रहाटकर यांच्याशिवाय अन्य कुणाचे नावच नव्हते. केवळ तीनच वर्षांत हा सारा प्रवास घडला.