आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेता क्लासेसचा संचालक बेपत्ता, सावकारीला कंटाळल्याचा ई-मेलमध्ये उल्लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील विजेता कोचिंग क्लासेसचे संचालक कुलवंतसिंग आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सिडको, उस्मानपुरा आणि समर्थनगर येथे असलेल्या क्लासेसच्या तिन्ही शाखा बंद पडल्याने सुमारे ९०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच क्लासेसवर शिकवणारे ४० ते ५० शिक्षक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, कुलवंत सिंग यांनी स्पंदननगर येथील राहत्या घराचे भाडे बुडवून ते बेपत्ता झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिसांत शनिवारी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता घरात काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्यात मी काही लोकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून शहर सोडत आहे, असा मजकूर लिहिला होता, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील फौजदार उत्तम मुंढे यांनी दिली. दरम्यान, 'दिव्य मराठी'ला gurmeet.makken@gmail.com या मेल आयडीवरून एक मेलही आला आहे. यात विजेता कोचिंग क्लासेसची संचालिका या नावाने मजकूर लिहिला आहे. त्यात काही खासगी सावकारांमुळे आमचे जीवन हैराण झाले आहे. पैसे वसुलीसाठी आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. वारंवार मोठी रक्कम वसूल करूनही त्यांचे कर्ज आमच्या डोक्यावर आहेच. यात पोलिसांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करून संबंधित तीन व्यक्तींची नावेही दिली आहेत. गेल्या सात महिन्यांतील आर्थिक व्यवहारांमुळे आम्ही डबघाईला आलो आहोत, असेही या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.