आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - चार वर्षांच्या विजनवासानंतर महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतिपद सत्ताधारी शिवसेनेकडे आले. काँग्रेस आघाडीने बहिष्कार घातल्याने युतीचे उमेदवार विकास जैन हे 9 विरुद्ध 0 मतांनी विजयी झाले. 2008 ते 2010 ही दोन वर्षे काँग्रेसचे अब्दुल साजेद, तर त्यानंतरची दोन वर्षे भाजपचे राजू शिंदे काँग्रेस आघाडीच्या मदतीने सभापती होते.
जैन यांच्या विरोधात आपलाच उमेदवार असावा, अशी भूमिका काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही घेतली. दोघांनीही माघार घेण्यास नकार दिला व एकमेकांच्या विरोधात बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपाठोपाठ शहर प्रगती आघाडीचे सदस्यही सभागृहाकडे फिरकले नाहीत. सकाळी दहा वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. युतीचे 9 सदस्य एकत्रितपणे सभागृहात पोहोचले. इकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक अभिजित देशमुख विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात शेवटची चर्चा करत होते. माघार घेणार नसाल तर आमचा बहिष्कार असल्याचे दोघांनीही जाहीर केले.
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे तीन उमेदवार रिंगणात राहिले. त्यामुळे मतमोजणी करावी लागली. त्यात जैन यांना 9 तर काँग्रेसचे बाळू गुजर आणि राष्ट्रवादीच्या निलाबाई जगताप यांना 0 मते मिळाल्याने जैन यांना विजयी घोषित करण्यात आले.
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. दोन वर्षे सभापती नसल्यामुळे तिजोरीचे नियोजन झाले नाही. शहराचा व्याप वाढल्याने खर्चावर र्मयादा घालणे शक्य नाही. त्यामुळे महसूल कसा वाढेल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे नवनिर्वाचित सभापती विकास जैन यांनी म्हटले आहे.
जैन यांच्यासमोरील आव्हाने
खासदार खैरे आणि दानवे यांच्या गटात समन्वय राखून वाटचाल करणे.
रखडलेल्या रस्ते कामांना गती देण्यासाठी नियोजन करावे लागेल.
महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने कामे न स्वीकारणार्या ठेकेदारांना आश्वस्त करण्यास प्राधान्य द्यावे लागेल.
केवळ एलबीटीवर अवलंबून न राहता मालमत्ता, पाणीपट्टी यातून महसूल वाढवण्यावर भर द्यावा लागेल.
संजय शिरसाट आणि किशनचंद तनवाणी या आमदारद्वयींचाही आदर राखावा लागेल.
सदस्य संख्या - 16
जैन यांना मिळालेली मते (9)- विकास जैन, राजू शिंदे, आगा खान, मोहन मेघावाले, प्राजक्ता राजपूत, नारायण कुचे, सविता घडामोडे आणि बाळासाहेब मुंडे.
बाळू गुजर यांना मिळालेली मते- 0
निलाबाई जगताप यांना मिळालेली मते- 0
अनुपस्थित सदस्य
काँग्रेस - असद पटेल, मोहंमद मुजिबोद्दीन आणि बाळू गुजर.
राष्ट्रवादी - निलाबाई जगताप आणि अक्रम खान
शहर प्रगती आघाडी- समीर राजूरकर आणि विजेंद्र जाधव.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.