आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilasrao Deshmukh News In Marathi, Congress, Marathwada, Divya Marathi

काँग्रेसला विलासरावांची जाणवते जाणीव, प्रचाराच्या पॅटर्नमध्‍ये बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसमध्ये सभा जिंकणारा नेता म्हणून विलासराव देशमुख यांची राज्यभर ओळख होती. त्यामुळे त्यांच्या सभेला हमखास गर्दी असायची. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा राज्यात सर्वाधिक गर्दी त्यांच्याच सभांना असायची. मात्र, त्यांच्या निधनानंतर राज्यात काँग्रेसकडे सभा गाजवणारा नेता नसल्यामुळे उणीव भासत आहे. त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला प्रचाराचा पॅटर्न बदलावा लागला. मतदारांनीच उमेदवाराकडे यावे, असा काँग्रेसी खाक्या बाजूला ठेवून काँग्रेस नेते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.


काँग्रेसकडे तोडीचा वक्ता, नेता नाही :
मराठवाड्यात सध्या काँग्रेसकडून पाच जागा लढवल्या जात आहेत. मात्र, या उमेदवारासाठी फारशा सभा अजून झाल्या नाहीत. अशोक चव्हाण सध्या स्वत:च्या नांदेड मतदारसंघासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सभा घेत आहेत. मात्र विलासराव देशमुखांसारखी ते सभा गाजवू शकत नाहीत. एकूणच सभा गाजवणारा नेता काँग्रेसकडे नसल्याने उमेदवारांचीदेखील अडचण होत आहे.


काँग्रेसने बदलले प्रचाराचे तंत्र : विरोधकांवर टीका करतानाही ती गमतीदार आणि खुमासदार शैलीत करणे तर कधी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांची हळूच फिरकी घेणे विलासरावांना चांगलेच जमायचे. त्यांच्यांभोवती असलेले ग्लॅमर आणि सभेला मिळणारा प्रतिसाद यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघात सभा घ्यावी, असा प्रत्येक उमेदवाराचा आग्रह असायचा. मात्र, सध्या त्यांच्या तोडीचा नेता, वक्ता काँग्रेसमध्ये नाही. विलासरावांची पोकळी मराठवाड्यातच नाही तर राज्यातही जाणवत असल्याचे मत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.


काँग्रेसचा भार अशोक चव्हाणांवर : विलासरावांच्या वक्तृत्वामुळे विरोधकांच्या गडातही वातावरण बदलण्याची कायम भीती वाटायची. माजी आमदार केशवराव औताडे म्हणाले की, विलासरावांची पोकळी मराठवाड्यात नाही तर राज्यात सर्वत्र जाणवत आहे. सभा जिंकणारा नेता, हसत खेळत सर्वांना आपलेसे करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. ते व्यासपीठावरच्या नेत्यांचीही फिरकी घ्यायचे. त्यामुळे सभेत कधीच गंभीर वातावरण राहायचे नाही. आज विलासराव असते तर राज्यात 25 ते 50 सभा झाल्या असत्या. त्यांच्या तोडीचा वक्ता तर आम्ही उभा करू शकत नाही.


घरोघरी जाण्यावर भर
काँग्रेसने आता प्रचाराचे तंत्र बदलले आहे. सध्या सभांऐवजी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. मराठवाड्यात अजून फारशा सभा झाल्या नाहीत. सध्या अशोक चव्हाणांच्या सभा होत आहेत. विदर्भातल्या मतदानानंतर सभांचा जोर वाढेल. अरुण मुगदिया, सरचिटणीस काँग्रेस


गर्दी जमवण्याचे कसब
विलासरावांच्या सभांची खासियत होती. गर्दी जमवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. ते लोकांची मने जिंकणारे नेते होते. त्यामुळे त्यांची सभा व्हावी, असा आग्रह असायचा. आता त्यांची उणीव जाणवत आहे. डॉ. कल्याण काळे, आमदार काँग्रेस