आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामीणमध्ये पाणीबाणी, शहर 6 महिने निश्चिंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाविना जून संपत आल्याने भीषण दुष्काळाचे संकेत मिळत असले तरी तूर्तास औरंगाबादेतील उद्योगांची पाणी कपात होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाव्य टंचाईबाबत चर्चा केली. या वेळी उद्योगांच्या पाणी कपातीबाबत कुणीही बोलले नाही.
जायकवाडीत सध्या 4 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून मृत साठ्यातून पुढील सहा महिने शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे शहराचे पाणी व उद्योगाच्या पाण्याची तूर्तास चिंता नाही. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प तळ गाठत असल्याने काही दिवसांतच ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याची भीती आहे.

औरंगाबाद शहराच्या पाण्याची चिंता नसली तरी जिल्ह्यातील अन्य लघु व मध्यम प्रकल्पांत अवघे 10 टक्के पाणी असून ते झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नवीन जलस्रोत शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. तलावांमध्ये चर खोदणे, बोअर घेणे यातून पाणी उपलब्ध करावे लागेल. त्याबाबतची पाहणी 7 जुलैनंतर सुरू होईल. पेरणीला विलंब होत असल्यामुळे अन्य पिके वगळून मका आणि बाजरीला प्राधान्य देण्याचे आवाहन कृषी विभागाने पूर्वीच केले आहे.

शहरासाठी डिसेंबरपर्यंत नियोजन
पावसाने दगा दिला तर औरंगाबाद शहराला डिसेंबरपर्यंत टंचाई भेडसावणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देताना आयुक्त म्हणाले की, नाथसागरातील जिवंत पाणीसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा होत आहे. सध्या पाणीपातळी 455 मीटर आहे. हा साठा आणखी एक महिना पुरेल. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसता येईल. गेल्या वर्षी 12 कोटी रुपये खर्चून केलेल्या अ‍ॅप्रोच कालव्यामुळे पाण्याची टंचाई जाणवणार नाही. गतवर्षी एप्रिलपासून मृत जलसाठ्यातून पुरवठा होऊनही पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्यामुळे या वर्षी तशी स्थिती येणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. शहरासाठी समांतर जलवाहिनीचे काम दीड ते दोन महिन्यांत सुरू होईल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करून तलावांतील गाळ उपसण्याची कामे हाती घेण्याच्या सूचना करून पाण्याबाबत शासनाची गरज लागली तर शासन मदतीला तयार आहे, असे आश्वासन दिले.

जुलै मध्यानंतर परिस्थिती बिकट
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस अपेक्षित आहे. मात्र, जुलैच्या मध्यापर्यंत असेच वारे वाहत राहिले तर परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यानंतर प्रशासनही गंभीर होईल. उपलब्ध पाण्याच्या वापरावर बंधने येऊ शकतील. मात्र, आपल्याकडे दरवर्षीच जूनमध्ये पाऊस येतो असे नाही, अनेक वेळा तो जुलैमध्येही दाखल होतो. त्यामुळे अजून सर्वच जण सकारात्मक आहेत.