आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Demand To Sachin Tendulkar For The Improving Road

दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांची सचिन तेंडूलकरला साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर (जि. औरंगाबाद) - दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची मागणी करत तालुक्यातील वाकला येथील गावकर्‍यांनी राज्यसभा खासदार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला साकडे घातले आहे. जिल्हय़ातील नेत्यांकडून आश्वासनांखेरीज काहीच न मिळाल्याने ग्रामस्थांनी हा मार्ग निवडला.
औरंगाबाद व नाशिक या दोन्ही जिल्हय़ांच्या सीमेवर वाकला हे गाव आहे. डोंगर खोर्‍यातील या अतिदुर्गम गावाला जोडणार्‍या मुख्य रस्त्याची चाळणी झाली आहे. यामुळे इतर गावांशी संपर्क ठप्प आहे. सरपंच कुसूमबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत वाकला ते लोणी खुर्द, ढेकू, जातेगाव, तलवाडा यासह वाकला-गोंडेगाव, वाकला-कासारी रस्त्यांच्या कामाला निधी मिळावा असा ठराव झाला. काम न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी ठरावही समंत झाला होता. याकामी पाठपुराव्यासाठी रस्ता दुरुस्ती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. रस्ते विकास विभागाकडे निवेदने, अर्ज दिले आहेत.
तरीही काहीच प्रगती होत नसल्याने ग्रामस्थांनी 2 डिसेंबरपासून ग्राम पंचायतीसमोर उपोषणाचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, सचिन तेंडुलकरला त्याच्या पत्त्यावर निवेदन पाठवण्यात आले. ग्रामस्थांना दररोज मरणयातना सोसाव्या लागत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
उपोषण मागे
मुख्यमंत्री निधीतून 50 लाख रुपये देऊन 15 जानेवारीपर्यंत काम मार्गी लावण्याचे आश्वासन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय निकम यांनी ग्रामस्थांना दिले. त्यामुळे सोमवारपासून सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले. मात्र निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा मात्र त्यांनी कायम ठेवला आहे.