औरंगाबाद - तनवाणी (नि:शुल्क पेयजल उपक्रम) प्रस्तुत दिव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात विनोद पाटील यांच्या विनोद पाटील टायगर्स संघाने शानदार कामगिरी करताना विजयी डरकाळी फोडली. विनोद पाटील टायगर्सने नीलेश सेठी आणि संतोष सेठी यांच्या सेठीज प्रगती इन्फ्रा संघाला 2 गड्यांनी पराभूत केले. सेठीज प्रगती संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 116 धावा काढल्या. प्रत्युत्तरात विनोद पाटील टायगर्सने हे लक्ष्य 17.4 षटकांत गाठले.
उदय, नितीन चमकले : धावांचा पाठलाग करताना विनोद पाटील टायगर्सकडून सलामीवीर आणि अनुभवी खेळाडू उदय पांडेने शानदार कामगिरी करताना 37 धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर शेख सादिक मात्र शून्यावरच बाद झाला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या विशाल गवळीने 15 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा काढल्या. अब्दुल कय्युमने 10 चेंडूंत एका चौकारासह 11 धावांचे योगदान दिले. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसर्या टोकाने उदय पांडेने शानदार फलंदाजी केली. उदयने 39 चेंडूंत 5 चौकारांसह 37 धावा काढून संघाला विजयासमीप पोहोचवले. उदय पांडे बाद झाल्यानंतर अष्टपैलू युवा खेळाडू नितीन फुलाणेने 18 चेंडूंत 1 षटकार 2 चौकारांसह नाबाद 27 धावा काढून संघाला विजयश्री मिळवून दिली. प्रवीण क्षीरसागरने 1, तर मुजीब दुर्राणीने 2 धावांचे योगदान दिले. दीपक पाटीलने 2 आणि लईक अली खानने नाबाद 6 धावा काढल्या. गोलंदाजीत सेठीज प्रगती इन्फ्राकडून स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू हरमितसिंग रागीने 3 गडी बाद करून प्रेक्षकांची मने जिंकली. सय्यद अनिसने 2 गडी टिपले.
गोलंदाजीतही उदय तळपला : तत्पूर्वी, सेठीज प्रगती इन्फ्राने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून सलामीवीर प्रीतेश चार्ल्सने 11 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर इम्रान पटेल अवघ्या एका धावेवर बाद झाला. मुज्तबा खानने 16 तर ईशांत रायने 22 धावांचे योगदान दिले. सय्यद अनिस व अतिक नाईकवाडे यांना भोपळासुद्धा फोडता आला नाही. सय्यद परवेजने 6 धावा तर मधुर पटेलने 13 धावा काढल्या. प्रज्वल घोडकेने 17 चेंडूंत नाबाद 20 धावा काढल्या. गोलंदाजीत विनोद पाटील टायगर्सकडून उदय पांडेने 4 गडी बाद केले. शेख सादिकने 2 विकेट घेतल्या.
खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस
विनोद पाटील टायगर्सचे संघमालक विनोद पाटील यांनी खेळाडूंवर लढतीदरम्यान रोख बक्षिसांचा पाऊस पाडला. पाटील यांनी तब्बल 24 हजार 500 रुपये खेळाडूंना रोख पारितोषिके वाटली. सामनावीर उदय पांडे, विशाल गवळी आणि अब्दुल कय्युमला प्रत्येकी 5 हजार, शेख सादिकला 7 हजार आणि कर्णधार प्रवीण क्षीरसागरला 2500 रुपये बक्षीस पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
आमचा संघ चांगला खेळला. या विजयाने खेळाडूंत उत्साह निर्माण झाला आहे. या उत्साहासह आम्ही पुढच्या सामन्यांत खेळून असाच दणकेबाज विजय मिळवू. आमचा संघ फायनलपर्यंत धडक देईल, असा विश्वास वाटतो.
- विनोद पाटील, विनोद पाटील टायगर्स
फोटो - सेठीज प्रगती इन्फ्रास्ट्रक्चरवर विजय मिळवल्यानंतर जल्लोष करताना टीम फ्रँचायझी विनोद पाटील, अतिक मोतीवाला, नगरसेवक अभिजित देशमुख, प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा, तारेक लतीफ, मुश्ताक पटेल आणि संघातील खेळाडू. छाया : रवी खंडाळकर