आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या शाळा, शिक्षक भरतीची गरजच काय?शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा परखड सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात सध्या अतिरिक्त ठरलेल्या १८ हजारांहून अधिक शिक्षकांचे समायोजन झाले असून अद्याप काही शिक्षकांचे समायोजन बाकी आहे. त्यामुळे इतर शिक्षकांची भरती होणार नाही, तसेच नवीन शाळांनाही मान्यता देण्याची गरज वाटत नाही, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. शिक्षक घडवणार्‍या डीटीएड महाविद्यालयांची गुणवत्ता काय, ते खरेच सुरू आहेत का, याबाबत शंका व्यक्त करत त्यांची गुणवत्ता तपासली जाणार असल्याचेही तावडेंनी स्पष्ट केले.

बीड येथे एका कार्यक्रमास जाण्यापूर्वी तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘डीटीएड महाविद्यालयांची सद्य:स्थिती पाहता त्यातील किती सुरू राहतील, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अशी महाविद्यालये व्यावसायिक अभ्यासक्रमांशी जोडण्याचा त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न राहील. सध्या किमान कौशल्यआधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर आमचा भर आहे.’

प्रवेश आरक्षण नाकारल्यास कारवाई : ‘शाळांतील२५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देणारा शिक्षण हक्क कायदा पाळला जात नाही?’ या प्रश्नावर तावडे म्हणाले, ‘८६ टक्के शिक्षण हे मराठी शाळांमधून होते. ज्या अल्पसंख्याकांच्या शाळा या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत त्यांनी आधी आरक्षित २५ टक्के जागा भराव्यात, नंतरच इतरांना प्रवेश द्यावेत. येत्या शैक्षणिक वर्षात या आरक्षित जागांच्या प्रवेशासंबंधी कडक कारवाई करण्यात येईल,’ असेही तावडेंनी स्पष्ट केले.

हार, तुर्‍याला बोलवू नका
शाळा, महाविद्यालयात स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सत्कार समारंभासाठी आपल्याला बोलवता प्रश्न सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक यांच्यात संवाद साधण्यासाठी बोलवावे, असे आवाहन करतानाच यापुढे ६० टक्के शिक्षकांच्या प्रश्नावर आणि ४० टक्के गुणवत्तेवर काम करावे लागणार असल्याचे तावडे म्हणाले.

हुंड्यासाठी शिक्षक?
डीटीएड महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. ते किती सुस्थितीत चालू आहेत, हा प्रश्न असल्याचे तावडे म्हणाले. नोकरी नसताना डीटीएडकडे का वळलात, असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला असता ते केवळ हुंडा चांगला मिळतो म्हणून शिक्षक झालो, असे उत्तर मिळायचे; परंतु त्याच विद्यार्थ्यांना आता लग्नासाठी मुलगी मिळणेही कठीण झाल्याचे तावडेंनी सांगितले.

सुरक्षा शाळा व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापनासाठी शाळेच्या परिसरातील पोलिस स्टेशन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग आहेत, परंतु मुलींसोबत शाळांमध्ये अथवा शाळेबाहेरील अत्याचारासाठी शाळांनीदेखील व्यवस्थापन समितीमार्फत लक्ष देणे गरजेचे आहे. मुलींच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. यासाठी येणार्‍या शैक्षणिक वर्षात शालेय व्यवस्थापन समितीवरही आमचे लक्ष असल्याचे तावडे म्हणाले.

इंग्रजी शाळांवर अंकुश
आयसीएसई आणि सीबीएसई शाळांवर राज्य शासनाचा अंकुश नसतो. केवळ ना हरकत देण्यापर्यंत तो मर्यादित आहे, तरी यातून पळवाटा शोधल्या जातात, त्यामुळे भविष्यात या शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तावडे म्हणाले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ग्रामीण विकास संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याला राज्य सरकार मान्यता देईल. तसेच याच शैक्षणिक वर्षात त्याची सुरुवात होणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.