आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violence Not Manner, How Narendrabhai Committed Riot ?, Modi Younger Brother Pralhad Modi Question

हिंसेचा संस्कारच नाही, तर नरेंद्रभाई दंगल कसा घडवील?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्हा भावंडांवर आमच्या आई-वडिलांनी हिंसेचा संस्कारच केलेला नाही. मग नरेंद्रभाई दंगल घडवीलच कसा? दंगलींमागे त्याचा मुळीच हात नाही हे ठामपणे सांगतो, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी मंगळवारी मोदींची बाजू मांडली. गुजरातच्या रेशन धान्य दुकानदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी एका खासगी कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत अनेक मुद्द्यांचा ऊहापोह केला.
प्र. : दंगल पेटवली, मुस्लिमांचे हत्याकांड केले, असा आरोप मोदींवर वारंवार होतो. या आरोपात कितपत तथ्य आहे असे तुम्हाला वाटते?
उ. : पंतप्रधानपदासाठी मोदींची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून या आरोपाचा जोर वाढला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय एखाद्या व्यक्तीला दोषी मानत नाही तोवर ती व्यक्ती राष्ट्रपतिपदाची निवडणूकही लढवू शकते.
प्र. : अनेक वर्षे नरेंद्रजींसोबत राहिलात. त्यांचा स्वभाव हिंसक असल्याचे कधी वाटले नाही?
उ. : आम्ही पाच भाऊ आहोत. आम्हा कोणावरही आई-वडिलांनी हिंसेचा संस्कारच केलेला नाही. नरेंद्रभाईचा दंगलीमागे मुळीच हात नाही.
प्र. : मग कुणाचा हात आहे? ही दंगल कुणीतरी घडवलीच ना? की आपोआपच सगळे घडत गेले?
उ. : हे शोधायचे असेल तर आधी गोध्रा येथे कारसेवकांना कोणी जिवंत जाळले, याचा शोध घेतला पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून रेल्वेला आग लावली गेली. याचा आधी शोध घ्या, मगच मोदींवर ठपका ठेवा. मोदीविरोधकांना माझे हे आवाहन आहे.
प्र. : तरीही दंगल कोणाच्या तरी सांगण्यावरूनच झाली. विहिंप, बजरंग दल, रा.स्व. संघाचे लोक रस्त्यावर उतरले होते, हे सत्य ना?
उ. : ते सगळे आपोआप घडत गेले. गोध्रा येथून कारसेवकांचे मृतदेह अहमदाबादला आले आणि ते पाहून लोक भडकले. कोणी एखाद्याच्या गालावर थप्पड मारली तर त्याची रिअ‍ॅक्शन उमटणारच ना.
प्र. : मोदींनी दंगलींवर नियंत्रण ठेवले नाही, हे तरी खरे ना?
उ. : मुळीच नाही. अहमदाबाद तिस-या दिवशी शांत झाले. या घटनेला बरीच वर्षे झाली. आज गुजरातेत मुस्लिम आनंदात आहेत. प्रगती करत आहेत. त्यांना धोका वाटता तर ते तेथे राहिले असते का?
पत्नीला सोडणे हा मोदी
यांचा व्यक्तिगत मामला
प्र. : मोदींनी पत्नीकडे पाठ फिरवली. तुम्ही कधी त्यांच्याशी बोलला नाहीत?
उ. : तो त्यांचा व्यक्तिगत मामला आहे. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी तो निर्णय घेतला. मी त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्यांच्या पत्नीशीही संपर्क साधला नाही.
प्र. : वहिनींशी बोलावे असे कधी वाटले नाही का?
उ. : नाही. कारण वेगळे होण्याचा तो त्यांचा निर्णय होता. त्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्याचा कधी प्रश्नच आला नाही.
प्र. : पण त्यांनी पत्नीला असे सोडून देणे योग्य वाटते का?
उ. : तुम्हाला मी सांगितले ना, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही माझ्या आईला का सोडून दिले, असे मुलगा बापाला कसे विचारील?