आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केऱ्हाळ्याच्या निझामकालीन शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम, विद्यार्थ्यांना मिळणार अाधुनिकतेचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- केऱ्हाळा येथील स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या पहिल्या शाळेत शिक्षक व ग्रामस्थांच्या सहभागातून तालुक्यात पहिले संगणकीय शिक्षण जूनपासून सुरू झाले. लोकसहभागातून येथे व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केल्याने शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षण घेण्याची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाली आहे.

औरंगाबाद-सिल्लोड रस्त्यापासून पाच किमी अंतरावर केऱ्हाळा (तालुका सिल्लोड) गावात तालुक्यात पहिली निझामकालीन शाळा ८ सप्टेंबर १८९६ रोजी सुरू करण्यात आली होती. त्या वेळी सिल्लोड तालुकाच अस्तित्वात नव्हता. सिल्लोडला भोकरदन तालुका होता. आजपर्यंत ही शाळा विविध उपक्रम राबवत चांगल्या प्रकारे सुरू आहे. पूर्वीपासूनच गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले असल्याने ते गावाच्या विकासासाठी सर्व प्रकारचे योगदान देण्यास तयार असतात. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडक व पदवीधर शिक्षक रामचंद्र मोरे यांनी व्हर्च्युअल क्लासरूम व संगणकशास्त्र शिकवण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांचे साहित्य शिक्षक व गावकऱ्यांच्या सहभागातून खरेदी करण्याचा प्रस्ताव उन्हाळ्याच्या सुटीत सरपंच सविता दत्तात्रय कुडके व शालेय समितीचे अध्यक्ष राजू नारोळे यांच्यासमोर ठेवला. शिक्षकांनी मांडलेल्या प्रस्तावाला गावकऱ्यांनी उचलून धरले.

बावीस शिक्षकांनी प्रत्येकी तीन हजार असे सहासष्ट हजार रुपये आपल्या पगारातून दिले. उर्वरित रक्कम गावकऱ्यांनी जमा केली. यातून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व्हर व वीस मॉनिटर आणण्यात आले. जूनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवसापासून संगणकीय शिक्षणाला सुरुवात झाली. मुंबईच्या सुजय फाउंडेशनने बिहारचे विक्रमकुमार यांची विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शिक्षकाचा खर्च सुजय फाउंडेशन करते. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळेत ६४० विद्यार्थी असून सद्य:स्थितीत सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असणारी शाळा आहे. व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सर्व विद्यार्थी शासकीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेतात. तर तिसरी ते पाचवीचे २५० विद्यार्थी संगणकशास्त्र शिकतात. शिक्षकांच्या पुढाकाराने शिक्षक व गावकऱ्यांनी दिलेल्या सहभागामुळे गावपातळीवर चांगल्या प्रकारचे आनंददायी शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधांसाठी पालकही शाळेला सहकार्य करत आहेत.
शिक्षक सहकार्यास तयार
^आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे असे पालकांना वाटते. परंतु ग्रामीण भागात आर्थिक अडचणी असल्याने लोकसहभागातून विषयांना गती मिळते व पालकांवर फारसा भार पडत नाही. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्गणी देतील, तुम्हीही सहभाग नोंदवा, अशी विनंती केल्याने सर्वजण लगेच तयार झाले.
सदाशिव बडक, मुख्याध्यापक.

१०९१ मध्ये दोन मुली होत्या केऱ्हळाच्या शाळेत
गावात सुरुवातीपासूनच शिक्षणाचे महत्त्व असल्याचे निझामकालीन हजेरीपटावरून लक्षात येते. हिजरी १३२०-२१ म्हणजे सन १९०० -१९०१ मध्ये वेणुबाई व मैनाबाई पंढरीनाथ या दोन मुलींची नावे शाळेच्या हजेरीपटावर आहेत. आजच्या काळात मुलांनी शाळेत यावे यासाठी प्रयत्न करावे लागत असताना शंभर वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शाळेत मुली जात होत्या, हे विशेष आहे.
बातम्या आणखी आहेत...