आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे अमित शहा-राजेंद्र दर्डांची भेट तूर्त टळली !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिनाभरापूर्वी आपल्याविरुद्ध लढणा-या व गरळ ओकणा-याला कशाला भेटायचे, असा सवाल करून निदान औरंगाबादेत तरी भेटू नका, असे म्हणत भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘अब नहीं आ सकता’ असा निरोप काँग्रेसचे माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना पाठवला. त्यामुळे बराच गाजावाजा झालेली या दोघांची शनिवारची भेट तूर्त तरी टळली. दरम्यान, याविषयी मला काहीच माहिती नाही, असा दावा दर्डा यांनी केला, तर त्यांचे पुत्र ऋषी यांनी शहांनीच भेटीची इच्छा व्यक्त केली होती, असे म्हटले.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच दर्डा यांनी "अच्छा आदमी'चे पोस्टर लावले. तेव्हाच ते भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. औरंगाबाद पूर्वमधून तिस-या स्थानी फेकल्या गेल्यावर तर दर्डांची धडपड वाढल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातही बोलले जाऊ लागले. त्यातच शहा दर्डांना भेटणार, अशी चर्चा शहरात होती.

पदाधिका-यांचे ऐकले, शहांनी भेट टाळली
शहांचा ताफा दौलताबादहून निघाला. कोणत्याही क्षणी ते दर्डांच्या निवासस्थानी जातील, असे चित्र होते. काही स्थानिक पदाधिका-यांनी खरेच दर्डांना भेटणार का, अशी विचारणा त्यांना केली. त्यावर काही अडचण आहे का, असा सवाल शहांनी केला. मग पदाधिका-यांनी दर्डा महिनाभरापूर्वीच आपल्याविरुद्ध लढले. सावे यांना पाडण्यासाठी त्यांनी अपप्रचार केला. त्यांचे धोरण नेहमीच भाजपविरोधी राहिले आहे, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर शहांनी प्रतिप्रश्न न करता गाडी थेट सिडकोत घ्या, अशी सूचना केली.
दर्डांच्या प्रतिनिधींना शहा म्हणाले, देर हुई है
सूत्रांनुसार दुपारी २ वाजता शहा सिडकोत रत्नसुंदरसुरीश्वर महाराजांना भेटायला गेले. तेथे आलेल्या दर्डांच्या प्रतिनिधींनी किती वाजता येत आहात, असे िवचारले. त्यावर शहर में पहुँचने में बहोत देर हुआ है. अब नही आ सकता, असे म्हणत शहा पत्रपरिषदेला निघून गेले.
धादांत खोटे...किमान मला माहिती नाही : दर्डा
शहा भेटीला येणार होते, हे धादांत खोटे आहे. किमान मला तरी याबद्दल काही माहिती नाही. मी कार्यालयीन कामात व्यग्र होतो. शहांशी माझा संपर्क नाही. कधी त्यांना भेटलो, बोललो नाही. कदाचित माझा मुलगा ऋषीने निमंत्रण दिले असावे, असे दर्डा म्हणाले.
उशीर झाल्याने शहा यांची भेट टळली
अमित शहा यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पाऊस सुरू झाल्याने ते नियोजित वेळेपेक्षा उशिरा औरंगाबादेत पोहोचले. त्यामुळे त्यांची भेट टळली आहे.
- ऋषी दर्डा, राजेंद्र दर्डा यांचे पुत्र
दर्डांकडूनच निमंत्रण : स्थानिक भाजप
औरंगाबादेत भेटण्याची इच्छा असून तुम्ही अवश्य या, असे दर्डांकडून शहांना निमंत्रण होते. शहांनी दर्डांना भेटण्याची इच्छा व्यक्त करण्याचा दावा हास्यास्पद असल्याचे भाजप पदाधिका-यांचे म्हणणे आहे.

वेळापत्रकात "भेट', बंगल्यावर बंदोबस्त
शहा यांच्या दिल्लीहून आलेल्या दौरा वेळापत्रकात दुपारी २ वाजता दर्डांशी भेट, स्थळ जालना रोड असे होते, असे पदाधिकारी म्हणाले. दर्डांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारांवर पोलिस बंदोबस्तही होता.