आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणी पालिकेला दिला पाहुण्यांनी सहिष्णुतेचा डोस, सत्य बोलू दिले जात नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पदाधिकारी- अधिकारी संघर्ष, एमआयएमसाेबतचा सत्ताधाऱ्यांचा संघर्ष असे संघर्ष वर्षभरात अनुभवणाऱ्या महापालिकेत आज वर्धापनदिनी सहिष्णू-असहिष्णुतेचा मुद्दा आडवळणाने का होईना जाहीरपणे निघाला. साहित्य अकादमी युवा साहित्यिक पुरस्कारप्राप्त डाॅ. वीरा राठोड यांनी या विषयाला तोंड फोडत सत्य बोलू दिले जात नसल्याचे चित्र दिसत असल्याची खंत व्यक्त केली.

आज महापालिकेचा ३३ वा वर्धापन दिन होता. यानिमित्त महापालिकेच्या वतीने औरंगाबादचा नावलौकिक देश-विदेशात पोहोचवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. नाथराव नेरळकर, साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कारप्राप्त डाॅ. वीरा राठोड, मिस दिवा नवेली देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डाॅ. उदय डोंगरे, मकरंद जोशी, विवेक देशपांडे, दिनेश वंजारे, वंदिता जोशी सर्वेश भाले यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना डाॅ. राठोड यांनी सत्काराला उत्तर देताना सध्या देशभर गाजत असलेल्या सहिष्णू-असहिष्णू वादावर मवाळपणाने का होईना भाष्य केले. ते म्हणाले की, सत्य बोलू दिले जात नाही असे चित्र आज दिसत आहे. अगदी साॅक्रेटिसच्या काळापासून हे सुरू आहे. सत्य मरत नाही, पराभूत होत नाही असेही त्यांनी सांगितले. ज्या समाजाला कला संस्कृतीबद्दल जाणीव असते तो समाज आदर्श होण्याकडे वाटचाल करीत असतो असे सांगत त्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पं. नाथराव नेरळकर यांनी नवेली देशमुख पुरस्कारप्राप्त खेळाडंूचे कौतुक करीत नातवांसोबत आजोबांचा सत्कार होत आहे या बाबत समाधान व्यक्त करीत मलाही आता विश्व सुंदर झाल्यासारखे वाटत असल्याची मिश्कील कोपरखळी मारली. सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नवेलीने शहर विकासाची जबाबदारी सर्वांची आहे असे सांगत चांगले नागरिक होण्याचे आवाहन केले. या वेळी डाॅ. उदय डोंगरे मकरंद जोशी, राजेंद्र जंजाळ, एमआयएमचे नासेर सिद्दिकी, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापिका अंजली चिंचोलीकर यांचाही सत्कार करण्यात आला.

शहराचे ब्रँड अॅम्बेसेडर
महापौरत्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी या कर्तृत्ववान मंडळींना तुम्ही शहराचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात असे सांगत शहराच्या विकासात तुमचाही सहभाग हवा असे आवाहन केले. कचऱ्याचा प्रश्न सर्वांना सोबत घेऊन सोडवणार सल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याचे आश्वासनही महापौरांनी दिले.

एकही घोषणा नाही
वर्धापनदिनानिमित्त शहरवासीयांसाठी मनपा काही प्रकल्पांची घोषणा करेल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. गतवर्षी तत्कालीन महापौर कला ओझा यांनी शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये सरकारकडून आणण्याची घोषणा केली होती. या वेळी महापौर तुपे यांनी तशी कोणतीही घोषणा केली नाही.
बातम्या आणखी आहेत...