आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे लॉटरीचा व्यवसाय, दुसरीकडे दरोडेखोरीचा 'प्रताप'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे लॉटरीचे दुकान आणि दुसरीकडे दरोडेखोरी करणाऱ्या विठ्ठल शिवाजी वाघमारे (४०, रा. रेणुकानगर, शिवाजीनगर) यास गोलवाडी दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. या दरोड्यामागे वाघमारे हा मास्टर माइंड असून त्याच्या गँगमधील २१ घरफोड्यांचे गुन्हे दाखल असणाऱ्या अजय रमेश वाहूळ ऊर्फ ठाकूर (रा. एकतानगर, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) आणि विनोद राम चाबुकस्वार (२३, रा. सिद्धार्थनगर, एन-१२, हडको) यांना अटक करण्यात आली. तीन जण फरार आहेत. हा दरोडा ३० मे रोजी प्रवीण तुलसीयान यांच्या घरी पडला होता. दरोडा उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना एक लाखाचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सहा दरोडेखोरांनी तुलसीयान यांच्या घरावर दरोडा टाकून २० लाखांचे सोने आणि चार लाखांची रोख रक्कम पळवली होती. हा तपास गुन्हे शाखा सर्व ठाण्यांतील गुन्हे प्रकटीकरण शाखांना देण्यात आला होता. मंगळवारी क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या संतोष मुदिराज आणि मनोहर कोलमी या दोघांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दरोड्याचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपीला त्याच्या घरून उचलले.
दरोड्यातील काही ऐवज पोलिसांकडून जप्त केला आहे. ज्या सराफाला सोने विकले होते त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, उपनिरीक्षक गणेश धोकरट, संतोष आहेरकर, मुनीर पठाण, प्रकाश डोंगरे, समद पठाण, दिलीप मोदी, अमोल शिंदे, एजाज शेख, नितीन चौधरी, नवनाथ परदेशी यांच्या पथकाने केली. या पथकाला पोलिस आयुक्तालयाकडून लाखाचे बक्षीस देण्यात आले, तर दरोडेखोरांची माहिती मिळवणाऱ्या मुदिराज आणि कोलमी यांना प्रत्येकी २५ हजारांचे विशेष बक्षीस देण्यात आले. या वेळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, खुशालचंद बाहेती, निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.
वाघमारेचे कारनामे
२०१०मध्ये पुंडलिकनगरातील बोरा ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी विठ्ठल वाघमारे होता. त्या वेळी वाघमारे आणि त्याच्या दोन साथीदाराने बंदुकीचा धाक दाखवून २५ लाखांचे सोने लुटले होते. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक रमाकांत पडवळ आणि कल्याण शेळके यांनी त्याला अटक केली होती. विशेष म्हणजे वाघमारे हा शहरात स्वत:ला व्यापारी असल्याचे सांगायचा. उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन, हडको भागात त्याची लॉटरीची दुकाने आहेत. त्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत संबंध आहेत. शहरात त्याचा बंगला असून मुले नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दरोडा टाकण्यापूवी तो कुटुंबास गावाला पाठवून देतो. एकाच वेळी दोन ठिकाणी दरोडे टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याची त्याची पद्धत आहे. वाघमारेच्या गँगवर मोक्का लावण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
घरातील कामगार संशयाच्या भवऱ्यात
तुलसीयान यांच्या घरातील कामगार संशयाच्या भवऱ्यात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. घरात कोणीही नसल्याची माहीती घरातील कामगारानेच चोरांना दिली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे वॉचमन, स्वयंपाकी आणि चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
आणखी दोन घरफोड्या...
ओव्हार जटवाडा येथे सोमवारी रात्री घरफोडी झाली. चोरट्याने कपाटातील सुमारे ३९ हजारांचा ऐवज लांबवला. सुभाषनगरातील दादाराव देहाडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. हर्सूल ठाण्याचे निरीक्षक हाश्मी यांनी पंचनामा केला. उपायुक्त वसंत परदेशी यांनी गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्याचे घर फोडले...
क्रांती चौकातील शासकीय निवासस्थानामधील एका विभागीय वन अधिकाऱ्याचे घर फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. बाळासाहेब जगताप खिडकी उघडी ठेवून झोपले होते. चोरट्यांचा आवाज होताच ते जागे झाले आणि चोरट्यांनी पळ काढला.
बातम्या आणखी आहेत...