आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक परीक्षेत उत्तीर्ण तरीही मोजमापात चुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या२५ वर्षांत दहावी, आयटीआय उत्तीर्ण होऊन महापालिकेत दुय्यम अावेक्षकपदी १८ जण रुजू झाले. त्यातील १७ जणांनी खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण केली. तरीही त्यांनी पूर्ण झालेल्या कामांच्या मोजमापात असंख्य चुका असतात. त्या दुरुस्त करण्यातच उपअभियंत्यांचा बहुतांश वेळ जातो, असेही समोर आले आहे.

स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या महापालिकेच्या कामांना दर्जा का नसतो, याचे प्रमुख कारण उच्चशिक्षित अभियंत्यांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. केवळ दहावी, आयटीआयमधील सर्वेअरचा अभ्यासक्रम केलेल्या १८ पैकी बहुतांश कनिष्ठ अभियंत्यांना कामाचे माप घेऊन अंदाजपत्रक बनवता येत नाही. त्याचा फायदा घेत ठेकेदारच कोट्यवधी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक बनवतात आणि त्यावर हे अभियंता सही ठोकून मोकळे होतात, ही वस्तुस्थिती ‘दिव्य मराठी’ने समोर आणली. तज्ज्ञांनी सांिगतले की, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वेअर कोर्समध्ये फक्त लेव्हल कशी मोजायची एवढेच शिक्षण दिले जाते. ड्रेनेजलाइन, जलवाहिनी नेमकी किती खोलवर असावी. तिला किती उतार द्यावा.

नवीन रस्ता तयार करायचा असल्यास त्याची लगतच्या जमिनीपासून किती उंची आहे आणि तो पुढे किती उंच करावा, याचा अभ्यास करून घेतला जातो. त्यामुळे या अभियंत्यांकडून कामांच्या मोजमापात गंभीर चुका आढळतात. महत्वाच्या कामांतील चुका उपअभियंते दुरुस्त करतात. उर्वरित कामांत त्या तशाच राहतात. तांत्रिक तपासणीत त्या उघड होतात. पण तोपर्यंत खर्च होऊन गेलेला असतो. काम पूर्ण झाले असे म्हणत ठेकेदार नगरसेवकांचे दडपण आणून बिल वसूल करतात.

व्यावसायिक परीक्षाही निरुपयोगी सर्वेअरचा कोर्स उत्तीर्ण करून दुय्यम आवेक्षकपदी रुजू झालेल्यांना कनिष्ठ अभियंतापदी मिळावी, या साठी राज्य शासनाने कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा मंडळाचा मार्ग ठेवला आहे. नाशिक येथील मेरी (महाराष्ट्र इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट) आणि बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अनुक्रमे जलवाहिनी, ड्रेनेजलाइन रस्ते, इमारत बांधकामविषयीच्या परीक्षा घेतल्या जातात. रुजू झाल्यावर दोन वर्षांनंतर ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर पदोन्नतीसह कोणतेही लाभ दिले जात नाहीत.
३०० गुणांच्या या परीक्षेत प्रामुख्याने अंदाजपत्रक तयार करणे, स्थळ पाहणी करून आराखडा बनवणे तसेच मौखिक मुलाखतीवर भर दिला जातो. औरंगाबाद महापालिकेतील सर्वेअर कोर्स केलेल्या १७ जणांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, त्याचा त्यांना कोणताही उपयोग झाल्याचे दिसून येत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रमाणपत्रे सादर करून पदोन्नती मिळवली
१९९८मध्ये सात जणांनी मेरीतून परीक्षा उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे सादर करून पदोन्नती मिळवली. वर्षभरानंतरच्या तपासणीत ती बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन नंतर ती मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे कारण दाखवून मागे घेण्यात आली. त्यातील दोन जण कनिष्ठ अभियंता पदावरूनच सेवानिवृत्त झाले.
बातम्या आणखी आहेत...