औरंगाबाद- देशभरातील आकाशवाणी केंद्रांवर नैमित्तिक उद्घोषकांच्या पुनर्स्वरचाचणी घेण्याच्या आकाशवाणी महासंचालकांच्या निर्णयाला केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (कॅट) स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे कार्यरत ज्येष्ठ उद्घोषकांच्या सेवा सुरळीत राहणार अाहेत. औरंगाबादेतील ३० ते ३३ उद्घोषकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
आकाशवाणी केंद्रावर पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे देशभरात कंत्राटी तत्त्वावर नैमित्तिक उद्घोषकांमार्फत सेवा घेतल्या जातात. महिन्याकाठी ते ड्यूटी याप्रमाणे त्यांना मोबदला दिला जातो. अशा पद्धतीने अनेक उद्घोषक २० ते २५ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. मात्र, वर्षांपासून आकाशवाणी महासंचालकांनी नैमित्तिक उद्घोषक आणि कॅम्पिअर्सच्या पुनर्स्वरचाचण्या घेण्याचा घाट घातला. यात अनुत्तीर्ण झालेल्यांना कामावरून कमी करून त्या जागी नवीन भरतीस सुरुवात झाली. अशा पद्धतीने देशभरातील दीड हजाराहून अधिक उद्घोषकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या.
न्यायालयाचा अवमान : नव्याने स्वरचाचण्या घेण्याच्या निर्णयाविरुद्ध केरळमधील उद्घोषकांनी केरळच्या कॅटमध्ये याचिका दाखल केली. एर्नाकुलम बेंचने यावर उद्घोषकांच्या बाजूने निकाल देत जुन्या कलाकारांच्या नव्याने स्वरचाचण्या घेण्यावर बंदी आणली. या निर्णयाला आकाशवाणी महासंचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथेही उद्घोषकांच्या बाजूने निकाल लागला. न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. त्याकडे दुर्लक्ष करत फेब्रुवारी आणि एप्रिल २०१७ मध्ये परिपत्रक काढून दर दोन वर्षांनी सर्व नैमित्तिक कर्मचाऱ्यांना लेखी, तोंडी पुनर्स्वरचाचण्या बंधनकारक असल्याचे सांगितले. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करणारा असल्याचे सांगत प्रत्येक राज्यातील उद्घोषकांनी कॅटमध्ये धाव घेतली. औरंगाबाद, नाशिक आणि धुळे केंद्रातील उद्घोषकांनी मुंबई कॅटमध्ये याचिका दाखल केली. यावर १७ जुलै रोजी अंतिम सुनावणी करताना कॅटने या पुनर्परीक्षेस स्थगिती दिली. पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे कॅटने सांगितले. यापूर्वी बीड, चंद्रपूर, पुणे, यवतमाळ आणि अकोला केंद्रांवरही पुनर्चाचण्यांवर बंदी घातली होती. उद्घोषकांच्या वतीने मीरा चौधरी, अॅड.शीतल छाब्रिया आणि अॅड.वाघ यांनी काम पाहिले.
‘वाणी’ उत्तीर्ण तरी...
प्रसारभारतीच्या वतीने नैमित्तिक उद्घोषकांना स्वरचाचणी घेऊन प्रमाणित करण्यासाठी वाणी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. वाणी उत्तीर्ण उद्घोषकांचा स्वर चांगला आहे, देशभरात कोठेही सेवा बजावण्यासाठी ते पात्र असल्याचे ही चाचणी प्रमाणित करते. मात्र, प्रमाणित केलेल्या उद्घोषकांना त्याच खात्याच्या महासंचालकांनी अपात्र ठरवत पुनर्चाचणी घेण्यास भाग पाडले. यामुळे देशभरातील उद्घोषकांत संताप उसळला.
जुन्या उद्घोषकांचे काय?
औरंगाबाद आकाशवाणी केंद्राने २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये अशा पुनर्चाचण्या घेत अनेक उद्घोषकांच्या सेवा थांबवल्या. कॅटच्या आदेशामुळे या चाचण्यांना स्थगिती मिळाल्याने जुन्या स्वरचाचण्याही चुकीच्या ठरतात. मात्र, यापूर्वी पुनर्चाचण्यांत अपात्र ठरवत ज्यांच्या सेवा कमी केल्या त्यांचे काय, असा प्रश्न उद्घोषकांनी उपस्थित केला. अपात्रतेला कॅटमध्ये आव्हान देणार असल्याचे या उद्घोषकांनी सांगितले.