आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 12 टक्के मतदारांकडेच आहेत ओळखपत्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवीन आधार कार्ड मिळवण्यासाठी रांगा लावणार्‍या जिल्ह्यातील मतदारांचे मतदार ओळखपत्र प्राप्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. 22 लाख 97 हजार मतदारांपैकी फक्त 2 लाख 9 हजार मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे. मतदानासाठी महत्त्वाचा पुरावा समजले जाणारे हे ओळखपत्र मिळवण्यासाठी सध्या निवडणूक विभागाने कंबर कसली असली तरी नागरिकांचा कमी प्रतिसाद हेच अपयशाचे कारण आहे. त्यामुळे फक्त अवघ्या 12 टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत.

नवीन मतदार नोंदणी सध्या बंद आहे. या काळात सध्या नावातील दुरुस्ती, वय किंवा लिंग चुकीचे नोंदवले गेले असल्यास त्यात बदल करणे, मतदार ओळखपत्र तयार करणे आदी कामे करण्यात येत आहेत. यासाठी वेळोवेळी प्रसिद्धी केली गेली असली तरी मतदारांचा प्रतिसाद मात्र मिळत नाही. लवकरच नवीन नोंदणी सुरू होणार असून त्याआधी जुन्या मतदारांनी नावातील दुरुस्तीबरोबरच ओळखपत्र मिळवून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हतगल यांनी केले आहे

नवीन नोंदणी सध्या बंद
नवीन मतदार नोंदणी सध्या बंद आहे. लवकरच ही नोंदणी सुरू होईल. तोपर्यंत दुरुस्ती, पत्ता बदल अशी कामे सुरू राहणार आहेत. नवीन मतदार नोंदणीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

दुरुस्तीसाठी काय करावे ?
तुमचा पत्ता बदलला, नावात किरकोळ दुरुस्ती आहे, वय चुकीचे छापलेले आहे. मतदार यादीत नाव आहे, पण फोटो नाही. यासाठी तातडीने मतदान केंद्र किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधा. तेथे तुम्हाला एक अर्ज मिळेल. त्याला अर्ज-8 असे म्हणतात. तो भरून द्या आणि निश्चित व्हा.

ओळखपत्रासाठी काय ?
सध्या निवडणूक विभागाचे कर्मचारी घरोघरी येऊन फोटो जमा करताहेत, पण तसे झाले नाही तर जवळचे मतदान केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊन स्वत:चा फोटो एका अर्जासह या विभागाकडे द्या. काही दिवसांत तुम्हाला मतदान ओळखपत्र मिळू शकते.

23 हजार मतदारांची नावे काढली
औरंगाबाद जिल्ह्याच्या मतदार यादीतून 23 हजार 397 नावे वगळण्यात आली आहेत. यातील 99 टक्के नावे ही मृत व्यक्तींची होती. मृत झालेले मतदार किंवा वारंवार संपर्क साधूनही उपलब्ध न होणार्‍यांची नावे वगळण्यात येतात. यामध्ये दुसरा मोठा वाटा असतो, तो स्थलांतरित मतदारांचा. स्थलांतर झाल्यानंतर नाव जुन्या यादीतून कमी करण्यात येते. एकाच मतदारसंघात स्थलांतर होणार असेल, तर फक्त अर्ज करावा लागतो. मतदारसंघ बदलत असेल, तर मात्र नव्या ठिकाणी अर्ज करून पूर्वीच्या मतदारसंघातील नाव वगळण्याचा दुसरा अर्ज भरून द्यावा लागतो. ही प्रक्रिया मतदान केंद्र अथवा संबंधित तहसील कार्यालयात होते.