औरंगाबाद- मतदार नोंदणीची प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असली तरी शेवटच्या टप्प्यात झालेली नोंद मतदार यादीत येईलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे मतदार यादीत नाव नसेल तर ते नोंदवण्याची संधी येत्या रविवारी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर चालून येत आहे. आयोगाचे अधिकारी रविवारी दिवसभर केंद्रावर उपस्थित राहणार असून तेथे आवश्यक त्या कागदपत्रांसह आपण गेलात तर नावाची नोंद होईल, नावातील दुरुस्त्याही करता येतील. यादीत नाव आहे की नाही, याचीही खात्री करता येणार आहे.
निवडणूक जारी झाल्यानंतर पहिल्या रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचार्यांनी उपस्थित राहून नागरिकांना मतदार याद्या दाखवाव्या, नावातील तसेच पत्त्यातील दुरुस्ती असेल तर ती करावी, यादीत नाव नसेल तर नव्याने अर्ज भरून घ्यावेत, असे आयोगाने पूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार येता रविवार (9 मार्च) हा आचारसंहितेतील पहिला रविवार असून या दिवशी देशात सर्वत्र आयोगाचे कर्मचारी मतदान केंद्रांवर असतील. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 23 लाखांच्या पुढे गेली असून 18 वर्षांवरील प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आयोगाचे प्रयत्न आहेत. 23 लाखांची नोंदणी असेल तर अवघ्या दीड लाख नागरिक, युवकांनी का मागे राहावे, असा प्रश्न आयोगाने उपस्थित केला आहे.
यादीत नाव नसेल तर काय: मतदारांना येथे नवीन यादी पाहता येईल. त्यात नाव नसेल तर रहिवासी पुरावा, ओळखपत्र एवढे पुरावे सोबत ठेवा म्हणजे लगेच अर्ज भरून देता येईल. त्यानंतर पंधरा दिवसांत पुरवणी यादी तयार होईल, त्यात नावाचा समावेश केला जाईल, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी येत्या रविवारी स्वत:साठी वेळ काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर मतदारांना लगेचच मतदान ओळखपत्र दिले जाणार आहे.