आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१ डिसेंबरपासून मतदार नोंदणी; ७ व १४ डिसेंबरला प्रत्येक मतदान केंद्रावर करता येणार नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या १ जानेवारी २०१५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवतरुणांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान हाती घेतले जाणार आहे. त्याआधी अन्य काहीजण मतदार यादीपासून वंचित राहू नये म्हणून १ डिसेंबरपासून विशेष मतदान नोंदणी अभियान हाती घेतले जाणार आहे.
मतदारांना तहसील कार्यालयात येण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून ७ व १४ डिसेंबरला आयोगाचे कर्मचारी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर हजर राहणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ ते १६ डिसेंबरपर्यंत प्रत्येक तहसील तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात नवीन मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचबरोबर यापूर्वी मतदार यादीत नाव आले; परंतु त्यात दुरुस्ती आहे किंवा मधल्या काळात ज्यांचा पत्ता बदलला आहे, असे मतदारही या मोहिमेत अर्ज करून पत्त्यातील बदल करून घेऊ शकतील. चाकरमाने मतदार तसेच युवकांना तहसील तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अर्ज देणे शक्य होत नाही. अशांची गैरसोय होऊ नये म्हणून ७ व १४ डिसेंबरला (रविवारी) आयोगाचे कर्मचारी नजीकच्या मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हजर राहणार आहेत. ते अर्ज स्वीकारतील. पत्ता तसेच नावातील दुरुस्तीही करणार आहेत.

२५ जानेवारीनंतर ओळखपत्र वाटप
१६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०१५ या काळात नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व स्थलांतराचे स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर १५ ते २० जानेवारी या काळात संगणीकृत यादी तयार केली जाईल. त्यानंतर २१ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २५ जानेवारीनंतर नवीन मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप केले जाईल. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन आयोगाच्या वतीने स्थानिक अधिकाऱ्यांनी केले आहे.