औरंगाबाद- मतदार नोंदणी अभियानादरम्यान येत्या 5 एप्रिलपर्यंत तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात मतदार नोंदणी अर्ज भरून देता येणार आहे. दरम्यान, रविवारी (9 मार्च) मतदार याद्या दाखवण्याबरोबरच नवीन अर्ज स्वीकारणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर येणार आहेत.
लोकसभेच्या गत निवडणुकीत जेथे मतदान केंद्र होते, तेथे जाऊन नागरिकांनी मतदार यादीतील नावाची शहानिशा करून घ्यावी, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नावनोंदणी केली जाणार असली, तरी त्यांची नावे यादीत कितपत समाविष्ट होतील, हे नक्की सांगता येणार नाही. त्यामुळे एका अर्थाने रविवारच्या नोंदणीमुळे मतदार यादीतील नाव पक्के होऊ शकते. त्याचबरोबर मतदार ओळखपत्रही मिळू शकते.
पुरवणी यादीची डेडलाइन 5 एप्रिल असली, तरी नंतर घाईमध्ये ओळखपत्र देणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी कार्यालयात, तर रविवारी मतदान केंद्रांवर जाऊन नावाची खात्री करावी अन् यादीत नाव नसेल, तर नव्याने नोंदणी करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.