औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू झाली आहे. मजूर, चाकरमान्यांना तहसील कार्यालयात जाणे शक्य होत नाही. त्यांनाही नोंदणी करता यावी यासाठी आयोगाचे अधिकारी, कर्मचारी शनिवार अन् रविवार (28, 29 जून) कार्यालयीन वेळेत नजीकच्या मतदान केंद्रांवर हजर राहणार आहेत.
नवीन नावनोंदणीबरोबरच नावात, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतर आदीची प्रक्रियाही येथे केली जाणार असून मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत आयोगाचे कर्मचारी अर्ज केल्याची पोचपावती देत नव्हते. मात्र अर्ज करणार्यांना अर्ज केल्याची पोच पावती अवश्य घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार नोंदणी सुरू असली तरी वेळेत नोंदणी केली तर नाव मूळ यादीत येणार आहे. पुढील वर्षी होणार्या महानगरपालिका निवडणुकीसाठी हीच यादी अंतिम असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही लागतील कागदपत्रे
नवीन मतदारांसाठी वयाचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी पुरावा आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे ही कागदपत्रे लागणार आहेत. जुन्या मतदारांना वयाचा पुरावा बंधनकारक नाही.